कोल्हापूर : सिद्धार्थनगर कमानीजवळ भारत तरुण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त लावलेले फलक आणि साउंड सिस्टिमच्या वादातून झालेल्या दगडफेकप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन्ही गटातील सुमारे ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला. यातील ३१ जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून, लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार आहे. दरम्यान, दोन्ही गटांनी समजुतीची भूमिका घेतल्याने शनिवारी (दि. २३) तणाव निवळला. पोलिसांनी बंदोबस्त कायम ठेवला असून, दगडफेकीत सात वाहनांचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याची माहिती दिली.
दोन गटातील वादाचे पर्यवसान दगडफेक आणि जाळपोळीत झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा परिस्थिती नियंत्रणात आणून दोन्ही गटातील सुमारे ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी दगडफेक करणे, मालमत्तांचे नुकसान करणे, शस्त्रे नाचवून दहशत माजवणे, पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले आहेत. शनिवारी दिवसभर पोलिसांनी दोन्ही गटातील प्रमुखांना घेऊन शांतता प्रस्थापित करण्यावर भर दिला. सिद्धार्थनगर येथील समाजमंदिरात आणि राजेबागेस्वार येथील दर्ग्यात वरिष्ठ पोलिस अधिक-यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. त्यानंतर पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्या उपस्थितीत पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या सलोखा बैठकीत दोन्ही गटाने वादावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला.
दिवसभर व्यवहार बंद
तणावाची स्थिती आणि पोलिसांचा बंदोबस्त यामुळे शनिवारी दिवसभर सिद्धार्थनगर चौक परिसरातील दुकाने, व्यवसाय बंद राहिले. तणाव काहीसा निवळला असला तरी, बंदोबस्त कायम ठेवणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली. तसेच गरज असल्यास सिद्धार्थनगर कमानीजवळ पोलिस चौकी तयार करू, असे अधीक्षकांनी सांगितले.
यांच्यावर गुन्हे दाखल
पोलिस हवालदार एकनाथ मारुती कळंत्रे यांच्या फिर्यादीनुसार राजेबागेस्वार परिसरातील संशयित आरोपी आसिफ शेख, शहारुख शेख, कौशिक राजू पटवेगार, सोहेल पटवेगार, तन्वीर मुजावर, नौशाद मुजावर, शाहरुख रिक्षावाला, तौसिफ शेख, अब्दुल रौफ सिद्धिकी, अश्पाक गॅसवाला, जरीब इमानदार रिक्षावाला, सोहेल शेख, समीर मिस्त्री गॅरेजवाला, परवीन बशीर शेख, आश्रफ सिद्धीकी, इजाज शेख, साहील हकीम, फरहाज नायकवडी, निहाल शेख, सद्दाम महात, अश्पाक नायकवडी, इकबाल सरकवास, बिलाल शेख, मुन्ना सिद्धीकी यांच्यासह अनोळखी १५० ते २०० जणांवर गुन्हा दाखल केला. तसेच सिद्धार्थनगर परिसरातील सूरज कांबळे, अभिजित कांबळे, शुभम कांबळे, विजय पटकारे, महेश कांबळे, लखन कांबळे, गणेश कांबळे यांच्यासह अनोळखी १५० ते २०० जणांवर गुन्हा दाखल केला.