शिरोळ/गणेशवाडी/कुरुंदवाड : अलमट्टी धरण उंचीवाढीविरोधात शिरोळ तालुका बंदला प्रतिसाद मिळाला. जयसिंगपूर, कुरुंदवाड, नृसिंहवाडी, गणेशवाडी, दानोळी, दत्तवाड, यड्राव, अब्दुललाटसह परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा दिला.कुरुंदवाड येथे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट होता. नृसिंहवाडीतील मिठाई पेठ, मरगाई चौक, बनभाग येथील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसत आहे. त्यातच धरणाची पुन्हा उंची वाढविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतल्याने परिसरातील शेतकरी, व्यापारी, व्यावसायिकांसह नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. धरणाच्या उंचीवाढीला विरोध करण्यासाठी व शासनाला जागे करण्यासाठी शिरोळ तालुका सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने अंकली टोल नाका येथे रविवारी चक्का जाम आंदोलन केले होते. या आंदोलनाला पाठिंबा व अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला विरोध दर्शविण्यासाठी तालुक्यातील सर्वच व्यापारी, व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने रविवारी शांततेत बंद पाळला.
Kolhapur: अलमट्टी उंचीवाढीविरोधात शिरोळ तालुका बंदला प्रतिसाद, व्यावसायिकांसह नागरिकांतून संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:30 IST