पॅनलवरील डॉक्टरांचे दरमहा १५ तारखेला मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST2021-02-05T06:55:13+5:302021-02-05T06:55:13+5:30

कोल्हापूर : महापालिकेच्या पंचगंगा हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या पॅनलवरील २३ डॉक्टरांचे मानधन येथून पुढे दर महिन्यांच्या १५ ...

Remuneration of the doctors on the panel on the 15th of every month | पॅनलवरील डॉक्टरांचे दरमहा १५ तारखेला मानधन

पॅनलवरील डॉक्टरांचे दरमहा १५ तारखेला मानधन

कोल्हापूर : महापालिकेच्या पंचगंगा हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या पॅनलवरील २३ डॉक्टरांचे मानधन येथून पुढे दर महिन्यांच्या १५ तारखेपर्यंत करण्याचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी दिले. लेखापरीक्षक विभागाकडून बिले तपासणीसाठी विलंब होत असल्यावरून संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले.

पॅनलवरील डॉक्टरांचे गेल्या तीन महिन्यांपासून मानधन थकले आहे. सुमारे १० लाखांची ही रक्कम आहे. सिजर करणाऱ्या प्रसूतितज्ज्ञास तीन हजार, तर भूलतज्ज्ञांना दोन हजार रुपये मानधन आहे. मानधन वेळेत मिळत नसल्यावरून त्यांनी काम बंद करण्याचा इशारा दिला होता. कोरोनामध्ये काहींची नियुक्ती झाली असून, त्यांची नियुक्ती, टीडीएस कपात यांमध्ये लेखापरीक्षण विभागाकडून आक्षेप घेत बिले मंजूर केली नव्हती. त्यामुळे त्यांचे मानधन प्रलंबित होते. याची गंभीर दखल प्रशासक डॉ. बलकवडे यांनी घेतली. बैठकीत त्यांनी संबंधितांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. संबंधित रुग्णालयाकडून पॅनलवरील डॉक्टरांचे मानधनाचे बिल दर महिन्याला ८ तारखेला लेखापरीक्षकांकडे पाठवणे, लेखापरीक्षकांकडून तपासणी करून १५ तारखेला संबंधितांना मानधन देण्याचे आदेश दिले. ऑक्टोबरचे मानधन शुक्रवारी काढण्यात आले असून काम बंद ठेवू नका, अशी विनंती पॅनलवरील डॉक्टरांना केल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

चौकट

वरिष्ठ लिपिक नसल्याचा फटका

महापालिकेच्या रुग्णालयामध्ये कर्मचारी कमी असल्याचा फटका बसत आहे. पॅनलवरील डॉक्टरांचे मानधन वेळेवर काढण्यासाठी येथे वरिष्ठ लिपिक नसून कनिष्ठ लिपिकाकडे जबाबदारी दिली आहे. वरिष्ठ लिपिकांची भरती केल्यास बिले वेळेवर काढणे शक्य आहे.

Web Title: Remuneration of the doctors on the panel on the 15th of every month