अंबाबाई मूर्ती संवर्धनाचे धार्मिक विधी उद्यापासून

By Admin | Updated: July 21, 2015 01:01 IST2015-07-21T01:01:41+5:302015-07-21T01:01:41+5:30

रासायनिक प्रक्रिया : उत्सवमूर्तीचे पितळी उंबऱ्यापासून दर्शन

The religious rituals of Amabai idol conservation will begin tomorrow | अंबाबाई मूर्ती संवर्धनाचे धार्मिक विधी उद्यापासून

अंबाबाई मूर्ती संवर्धनाचे धार्मिक विधी उद्यापासून

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेदरम्यानच्या धार्मिक विधींना बुधवारपासून (दि. २२) प्रारंभ होत आहे, अशी माहिती श्री करवीरनिवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाचे अजित ठाणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापूजेने सुरू होणाऱ्या या विविध विधी गुरुवारी (दि. ६ आॅगस्ट) ला पुन:प्राणप्रतिष्ठा व अवभृत स्नानाने पूर्ण होतील.
ते म्हणाले, श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते बुधवारी महापूजेने धार्मिक विधी सुरू होतील. भाविकांच्या सोयीसाठी अंबाबाईची उत्सवमूर्ती पितळी उंबरा येथे ठेवण्यात येणार आहे. येथे देवीच्या काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंतचे सर्व नित्य धार्मिक विधी होतील. या काळात देवीचा नित्य अभिषेकवगळता देवस्थान समिती व श्रीपूजकांकडून बाहेरच्या भक्तांचे अभिषेक घेतले जाणार नाहीत. विधींचा खर्च श्रीपूजकांनी करायचा असल्याने भाविकांकडून कोणत्याही स्वरुपातील देणगी स्वीकारली जाणार नाही. पत्रकार परिषदेस ऐश्वर्या मुनिश्वर, गजानन मुनिश्वर, अ‍ॅड. केदार मुनिश्वर, गजानन नारायण मुनिश्वर, शेखर मुनिश्वर, आदी उपस्थित होते.
मूर्तीचे दर्शन गुरुवारपासून बंद
बुधवारी व गुरुवारी अंबाबाई मूर्तीमधील प्राणतत्त्व कलशामध्ये काढण्याचा विधी होणार आहे. हा विधी झाला की गुरुवारी मूर्ती पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सोपविली जाईल. त्यामुळे गुरुवार सकाळपासून ६ आॅगस्टच्या दुपारपर्यंत अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहील. पंडित राजेश्वरशास्त्री जोशी, उप्पनबेट्टीगिरी (धारवाड) यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या विधींचे मुख्य आचार्य वेदमूर्ती सुहास जोशी असून, वेदमूर्ती अनिरुद्ध जोशी व प्रसाद निगुडकर हे साहाय्य करणार आहेत.

Web Title: The religious rituals of Amabai idol conservation will begin tomorrow