राधानगरी अभयारण्य लोगो निवड वादाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST2021-02-05T06:52:15+5:302021-02-05T06:52:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी : जागतिक वारसास्थळ व या दर्जाचे पर्यटन केंद्र, ऐतिहासिक महत्त्व, निसर्गसंपन्न परिसर असलेल्या राधानगरी गवा ...

Radhanagari Sanctuary Logo Selection Controversy | राधानगरी अभयारण्य लोगो निवड वादाच्या भोवऱ्यात

राधानगरी अभयारण्य लोगो निवड वादाच्या भोवऱ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

राधानगरी :

जागतिक वारसास्थळ व या दर्जाचे पर्यटन केंद्र, ऐतिहासिक महत्त्व, निसर्गसंपन्न परिसर असलेल्या राधानगरी गवा अभयारण्याची ओळख ठळक करण्यासाठी वन्यजीव विभागाने निवड केलेला लोगो संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या स्पर्धेसाठी वन्यजीव विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नसलेल्या लोगोची निवड झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक व वन्यजीवप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शाहू महाराजांनी राखीव ठेवलेल्या दाजीपूर परिसरातील जंगलाचे १९५८ मध्ये राज्यातील पहिले अभयारण्य निर्माण करण्यात आले. १९८५ मध्ये त्याचा विस्तार करून राधानगरी अभयारण्य असे त्याचे नामकरण करण्यात आले. या अभयारण्याची ओळख निर्माण करणारा लोगो/सांकेतिक चिन्ह तयार करण्यासाठी विभागीय वन अधिकारी यांनी १७ सप्टेंबर २०२० च्या पत्रानुसार खुली स्पर्धा आयोजित केली होती. राज्यभरातून याला चांगला प्रतिसाद मिळून शंभराहून जास्त लोक सहभागी झाले. त्यातून नुकतीच एकाची निवड करण्यात आली आहे.

स्पर्धा आयोजित करताना वन्यजीव विभागाने येथील ठळक वैशिष्ट्ये जाहीर केली होती. त्यात जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनकेंद्र, राज्यातील पहिले अभयारण्य, शाहू महाराजांनी राखीव ठेवलेले जंगल, काळ्म्मावाडी-राधानगरी ही धरणे, जिल्ह्याला पाणी देणारे ठिकाण, गव्यासाठी प्रसिद्ध, सदाहरित जंगल, जागतिक वारसास्थळ, शिवगड व रांजणगड या किल्ल्यांचा समावेश, जैववैविधता यांचा समावेश होता. त्यामुळे ही वैशिष्ट्ये ठळक होतील अशी लोगोची रचना असावी, अशी सूचना केली होती.

मात्र, निवड झालेल्या लोगोत यातील कोणतेही वैशिष्ट्ये ठळकपणे नजरेत येत नाही. चुकीच्या इंग्रजी शब्दांचा वापर केला आहे. पाहता क्षणीच अभयारण्याची आठवण होईल असे काहीही त्यात नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

प्रतिक्रिया- वन्यजीव विभागाने निवडलेला लोगो साफ चुकीचा आहे. त्यात अभयारण्याचे कोणतेही वैशिष्ट्य दिसत नाही. अभयारण्याचे कोणतेही कार्यक्रम व योजना राबवताना स्थानिक पर्यावरण व निसर्गप्रेमींना विश्वासात घेतले जात नाही. केलेल्या सूचनांचा विचार केला जात नाही. ठराविक लोकांना जवळ करून उपक्रम राबविले जातात. त्यातून निव्वळ शासनाच्या निधीची उधळण सुरू आहे. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत विचार करणे आवश्यक आहे.

अनिल बडदारे- अध्यक्ष, राधानगरी नेचर क्लब,राधानगरी.

Web Title: Radhanagari Sanctuary Logo Selection Controversy