कुरुंदवाड : शहराच्या नळ पाणीपुरवठा योजनेबाबत शहर शिवसेनेने प्रजासत्ताक दिनी पालिका चौकात सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. आंदोलन होऊ नये यासाठी पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व पोलीस प्रयत्न करत आहेत. मात्र, आंदोलक भूमिगत झाल्याने पोलीस व पालिका प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
शहराला शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, यासाठी २०१६ मध्ये १३ कोटी रुपये खर्चाची योजना मंजूर होऊन प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली. मात्र, पाच वर्षे उलटली तरी पंचवीस टक्केही काम न झाल्याने व योजना मार्गी लावण्यात पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याने ही योजना राज्य शासनाकडे वर्ग करण्यात यावी, या मागणीसाठी शहर शिवसेनाप्रमुख राजू आवळे गेल्या दीड वर्षांपासून वेगवेगळे आंदोलन करत आहेत.
मात्र, आंदोलनाची पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने दखल न घेतल्याने तसेच योजना राज्य शासनाकडे वर्ग करावी यासाठी शहर शिवसेनेने सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या मागणीबाबत जबाबदार अधिकाऱ्यांकडून लेखी पत्र मिळावे, या निर्णयावर शिवसेना शहरप्रमुख आवळे यांच्यासह पाच आंदोलक ठाम आहेत. आंदोलनापूर्वीच पोलीस अटक करून आंदोलन थांबवतील म्हणून आवळे यांच्यासह पाच आंदोलक भूमिगत झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.