Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 13:05 IST

कसारा, वासिंद, मानखुर्द येथे सुविधा; नॉन-फेअर महसूल वाढवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: मध्य रेल्वेने कसारा, वासिंद (पूर्व-पश्चिम) आणि मानखुर्द या स्थानकांबाहेरील जागेत किराणा दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत स्थानकांवर प्रामुख्याने पाणी, बिस्किटे, स्नॅक्स किंवा तयार खाद्यपदार्थ मिळत होते. मात्र, आता दैनंदिन वापरातील किराणा साहित्यही मिळणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नॉन-फेअर महसूल वाढवण्याच्या धोरणाचा हा भाग आहे.

दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. मुंबईकरांना सकाळची धावपळ, कार्यालयीन वेळा आणि सायंकाळची गर्दी यामध्ये किराणा खरेदीसाठी वेगळा वेळ काढणे कठीण जाते. कसारा, वासिंदसारख्या वेगाने वाढणाऱ्या उपनगरी भागांमध्ये वेळेची बचत गरज आहे. कामावर जाताना किंवा घरी परतताना किराणा खरेदीसाठी वेगळा वेळ काढणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत स्थानकांबाहेर किराणा उपलब्ध झाल्यास नवा ट्रेंड रुजण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

‘मिनी कमर्शियल हब’कडे वाटचाल 

स्थानकांवरील व्यावसायिक जागांचा वापर वाढवून नॉन-फेअर महसूल उभारण्यावर रेल्वेचा भर आहे. त्याचाच भाग म्हणून किराणा दुकानांची संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. छोट्या उद्योजकांना व्यवसायाची संधी मिळणार आहे. भविष्यात स्थानके ‘मिनी कमर्शियल हब’ म्हणून विकसित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्रास होऊ नये, यासाठी हे स्टॉल्स स्थानकाबाहेरील जागेत उभारल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मीठ, मसाले, धान्य, तेलाची विक्री

अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार सध्या स्थानकांवर असलेल्या मल्टिपर्पज स्टॉलवर पाणी, पॅकेट मधले आणि शिजवलेले अन्नपदार्थ मिळतात. दरम्यान, किराणा स्टॉलवर स्वयंपाकासाठी लागणाऱ्या मीठ, मसाले, धान्य, तेल अशा वस्तू उपलब्ध होणार आहेत.

ई-लिलावाद्वारे राबविणार प्रकिया

मध्य रेल्वेने या दुकानांसाठी ई-लिलाव प्रक्रिया जाहीर केली असून, इच्छुक व्यावसायिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास इतर स्थानकांवरही किराणा दुकाने सुरू करण्याचा विचार करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Groceries now available for passengers at railway stations after alighting.

Web Summary : Central Railway will start grocery stores outside Kasara, Vasind, and Mankhurd stations. This initiative aims to boost non-fare revenue and provide convenience to commuters, offering daily essentials like grains, spices, and oil. This could transform stations into mini commercial hubs.
टॅग्स :मुंबईभारतीय रेल्वेमहाराष्ट्र