संकेश्वरातील संभाजी महाराज उद्यानाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST2021-04-04T04:25:28+5:302021-04-04T04:25:28+5:30

संकेश्वर : येथील नगरपालिकेच्या इमारतीसमोर १९७० च्या दशकात बांधण्यात आलेल्या बागेची (उद्यानाची) निगा राखण्यात पालिका कर्मचारी वर्गास अपयश ...

Poor condition of Sambhaji Maharaj Udyan in Sankeshwar | संकेश्वरातील संभाजी महाराज उद्यानाची दुरवस्था

संकेश्वरातील संभाजी महाराज उद्यानाची दुरवस्था

संकेश्वर : येथील नगरपालिकेच्या इमारतीसमोर १९७० च्या दशकात बांधण्यात आलेल्या बागेची (उद्यानाची) निगा राखण्यात पालिका कर्मचारी वर्गास अपयश आले आहे. १९७० मध्ये संकेश्वरमध्ये नगराध्यक्ष एस. आर. पाटील यांच्या काळात नव्याने उद्यानाची बांधणी करून उद्यानाची निगा राखण्यास पालिकेने खास कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती.

सहा वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष संजय शिरकोळी यांच्या काळात ७.५० लाख रुपये खर्चून शोभिवंत झाडे व लॉन तयार करून उद्यानाचे रूप बहरण्यात आले होते. त्यानंतर नगराध्यक्ष शौकत आवटे यांच्या काळात पालिकेच्या प्रशासकीय इमारतीनजीक सहा गुंठे जागेत सुमारे दोन लाख रुपये खर्चून संभाजी महाराजांच्या नावे उद्यानाची निर्मितीही करण्यात आली आहे.

तथापि, पालिका परिसरात पाण्याची सोय असूनही केवळ कर्मचारी वर्गाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे उद्यानाची अवस्था भकास झाली आहे. पाण्याविना बागेतील झाडे व लॉन कोमेजून गेली आहे. त्यामुळे पालिकेने उद्यानातील झाडांना पाणी देणे, नवी झाडे लावणे याकरिता एखाद्या माळ्याची नेमणूक करणे गरजेचे आहे.

सुमारे ४६ हजारांच्या घरात लोकसंख्या असणाऱ्या या शहरातील अबालवृद्धांना पहाटे व सायंकाळी विरंगुळ्यासाठी या उद्यानाचा वापर करता येतो. मात्र, उद्यानाची योग्य निगा राखण्यात पालिकेला अपयश आल्याने शहरवासीयांत नाराजी आहे.

-------------------------------------

फोटो ओळी : संकेश्वर येथील नगरपालिका इमारतीच्या प्रशासकीय इमारतीनजीक असणाऱ्या संभाजी महाराज उद्यानाची झालेली दुरवस्था. क्रमांक : ०३०४२०२१-गड-०३

Web Title: Poor condition of Sambhaji Maharaj Udyan in Sankeshwar