लोकच विरोधात उठाव करतील, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे सरकारवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:50 IST2025-10-03T12:50:15+5:302025-10-03T12:50:56+5:30
सरकार दिवाळखोरीत म्हणूनच शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा

लोकच विरोधात उठाव करतील, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे सरकारवर टीकास्त्र
कोल्हापूर : राज्य सरकारचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे काढून पुन्हा शेतकऱ्यांनाच देण्याचा प्रकार चालू आहे. ब्रिटिशांच्या काळात ज्या पद्धतीने कर लावला, तशा प्रकारे सरकारकडून वसुली सुरू असून सरकार दिवाळखोरीत असल्यानेच शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
आमदार पाटील म्हणाले, सरकारकडून शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात नसून, उद्या कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडूनही पैसे वसूल केले जाऊ शकते. मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून देखील तुम्ही पैसे कपात करून घेणार आहात का?
सरकारचे प्राधान्यक्रम बदलत चालले आहेत. त्यामुळेच व्होट चोरीसारखा प्रकार समोर येत आहे. आता लोक या सर्वांच्या विरोधात उठाव करतील.
निवडणुका आल्या की निधीची घोषणा
भाजपचा सर्व खेळ निवडणुकीपुरता असतो. जिल्हा परिषदा निवडणुका लागायच्या आधी निधीची घोषणा होईल. बिहारमध्ये निवडणुका लागल्या, लोकांना मदत केली. ज्या ज्या वेळेला निवडणुका लागतात, त्या त्या वेळेला लोकांचे अश्रू पुसण्याचा फार्स भाजप करते, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
बगल देण्यासाठी पडळकरांचे वक्तव्य
मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी तंबी देऊनही गोपीचंद पडळकर वादग्रस्त वक्तव्य वारंवार करतात कसे? याबाबत भाजपने त्यांना नोटीस पाठवली असेल तर सांगावे. राज्यात अनेक प्रश्न पेटत असताना त्यांना बगल देण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य केली जात असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.