पपला चार महिन्यांपासून होता सरनोबतवाडीत वास्तव्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST2021-02-05T06:52:31+5:302021-02-05T06:52:31+5:30

सतीश पाटील शिरोली : कुख्यात गुंड विक्रम गुर्जर ऊर्फ पपलाला पकडण्यात राजस्थान आणि कोल्हापूर पोलिसांना यश आले असले ...

Papala had been living in Sarnobatwadi for four months | पपला चार महिन्यांपासून होता सरनोबतवाडीत वास्तव्यास

पपला चार महिन्यांपासून होता सरनोबतवाडीत वास्तव्यास

सतीश पाटील

शिरोली : कुख्यात गुंड विक्रम गुर्जर ऊर्फ पपलाला पकडण्यात राजस्थान आणि कोल्हापूर पोलिसांना यश आले असले तरी पपला गेल्या चार महिन्यांपासून सरनोबतवाडी येथील उजळाईदेवी कॉलनीतील शिंगाडे यांच्या घरी बनावट आधारकार्ड दाखवून राहत असल्याची माहिती पुढे आली आहे. पपला हा राजस्थानवरून चार महिन्यांपूर्वी पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सरनोबतवाडी येथील उजळाईदेवी कॉलनीत शिंगाडे यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहायला आला होता. यावेळी त्याने आपले नाव उदलसिंग असे बदलून महाराष्ट्रातील आधार कार्ड बनविले होते. त्या आधारकार्डच्या आधारावर तो सरनोबतवाडीत वास्तव्यास होता. सुरुवातीला एकटाच राहत असलेला पपलाची लाईफ स्टाईल टापटीप अन् रुबाबात होती. दीड महिन्यांपूर्वीच त्याची जिम ट्रेनर जिया शिकलगार याच्याबरोबर ओळख झाली. त्यानंतर ते दोघे एकत्र राहत होते.

चौकट-

पपलावर अनेक गुन्हे

राजस्थानमध्ये पपलावर अनेक गुन्हे नोंद असल्याने राजस्थान पोलीस त्याचा शोध घेत होते. राजस्थान व हरियाणामध्ये

त्याच्याविरुद्ध खंडणी, मारामारी जिवे मारण्याच्या धमक्या व खुनाचा प्रयत्न, असे अनेक गन्हे नोंद आहेत.

स्थानिक टोळीप्रमुख शक्ती गुर्जर याच्या हत्येनंतर तो टोळीचा म्होरक्या बनला होता. याच गुन्ह्यासाठी राजस्थानमधील बहरोड पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, ७ सप्टेंबर २०१९ रोजी पपलाला अटक करण्यात आलेल्या पोलीस ठाण्यावरच त्याच्या सहकाऱ्यांनी एके-४७ रायफलने अंदाधुंद गोळीबार केला. यात विक्रम गुर्जर टोळीसह लॉकअपमधून पळून गेला. त्यानंतर राजस्थान पोलिसांचे पथक त्याचा दीड वर्षापासून शोध घेत होते.

पोलिसांना सुगावा...गाठले कोल्हापूर

पपला कोल्हापुरात असल्याचा सुगावा राजस्थान पोलिसांना लागल्यानंतर त्यांनी आठ दिवसांपासून त्याचा कोल्हापूरमध्ये शोध सुरू केला होता.

त्याला पकडण्यासाठी जयपूर परिक्षेत्राचे अपर पोलीस अधीक्षक सिद्धांत शर्मा, पोलीस निरीक्षक जहीर आब्बास व त्यांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले होते. जयपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक हवासिंह घुमरिया यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना संबंधित पथकाला स्थानिक पोलिसांकडून मदत द्यावी, अशी विनंती केली. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी पपलाला पकडण्यासाठी शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांना राजस्थानच्या पोलिसांसोबत दिले. यावर भोसले यांनी पपला राहत असलेल्या परिसराची पाहणी करून परिसरात कोल्हापूर आणि राजस्थान दोघांचे जवळपास शंभर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला. पपलाला ३० जानेवारीच्या पहाटे अटक केली.

योगायोग‌.... विशेष म्हणजे गतवर्षी बिष्णोई टोळीच्या मुसक्या आवळण्यात सहभागी असणाऱ्या शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक किरण भोसले यांनी पपलाला पकडण्यातही मोलाची कामगिरी बजावल्याने भोसलेेे यांची कामगिरी नजरेत भरणारी ठरली आहे. भोसले यांनी गेल्या वर्षी २९ जानेवारी २०२० मध्ये बिष्णोई टोळीला किणी टोल नाका येथे पकडण्यात मदत केली होती, तर ३० जानेवारी २०२१ रोजी पपलाही पकडण्याची कामगिरी केली.

फोटो ३० शिरोली पपला

ओळ १) कुख्यात गँगस्टर पपला ऊर्फ विक्रम गुर्जर सरनोबतवाडी येथे याच बंगल्यामध्ये वास्तव्यास होता.

२) सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले

Web Title: Papala had been living in Sarnobatwadi for four months