पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी, कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर केर्लीजवळ आले पुराचे पाणी; ४ राज्यमार्ग बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 14:34 IST2025-08-20T14:33:19+5:302025-08-20T14:34:22+5:30
वाहतूक विस्कळीत, कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद

पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी, कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर केर्लीजवळ आले पुराचे पाणी; ४ राज्यमार्ग बंद
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी धुवाधार पाऊस कोसळत असून, सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तब्बल ७९ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून, तळकोकणाला जोडणाऱ्या कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर पाणी आल्याने बंद झाला आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर केर्लीजवळ पाणी आल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. पाणी पातळीत वाढ झाल्यास चारपर्यंत वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीने ४०.०६ फुटांची पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकर धास्तावले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, रात्रभर एकसारखा पाऊस सुरू राहिला. मंगळवारी सकाळपासूनही पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. धरण क्षेत्रात चोवीस तासांत सरासरी १५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील १३९ शाळा बंद
जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीचे मार्ग बंद झाले आहेत. पूर परिस्थितीमुळे भुदरगड तालुक्यातील ९, गगनबावडा ४६, करवीर ५, पन्हाळा ३४ राधानगरी ३० व शाहूवाडी तालुक्यातील १५ अशा एकूण १३९ शाळा आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी बंद आहेत. याबाबत जिल्हा स्तरावरुन वारंवार आढावा घेतला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली.
राधानगरी धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे बंद
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून धरणाच्या एकूण स्वयंचलित ७ दरवाजांपैकी ४ दरवाजे बंद झाले आहेत. सध्या ३ दरवाजे खुले आहेत. स्वयंचलित द्वार क्र. ३, ६ व ७ मधून ४२८४ क्युसेक्स व बीओटी पॉवर हाऊस मधून १५०० क्युसेक्स असा एकूण ५७८४ क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.
४ राज्यमार्ग बंद
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग सुरू आहेत. राज्यमार्ग ४ बंद झाले असून १२ प्रमुख जिल्हा मार्ग, तर एक इतर जिल्हा मार्ग आणि १० ग्रामीण मार्ग असे एकूण ११ रस्ते बंधाऱ्यावर, रस्त्यावर पाणी आल्यामुळे बंद आहेत. बंद असलेल्या मार्गासाठी पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे.
सहा तासांत पंचगंगेच्या पातळीत दोन फुटांनी वाढ
मंगळवारी सकाळी आठपासूनच्या सहा तासांत पंचगंगेच्या पातळीत दोन फुटांनी वाढ झाली. तर पंधरा बंधारे पाण्याखाली गेलेत.
६८ मालमत्तांची पडझड
मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ६८ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यामध्ये ३२ लाखांचे नुकसान झाले आहे.
एसटीचे ८ मार्ग ठप्प
एसटी महामंडळाला पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. काेल्हापूर ते गगनबावडा, वाळवा ते बाचणी, गडहिंग्लज ते ऐनापूर आदी ८ मार्गांवरील वाहतूक बंद आहे.
धामणी खोऱ्याला बेटाचे स्वरूप
धामणी खोऱ्यातील बंधारे पाण्याखाली गेल्याने म्हासुर्ली, गवशी, अंबर्डे, पनोरे आदी गावांचा बेटाचे स्वरुप आले आहे.