आता प्रतीक्षा एप्रिलच्या पगाराची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST2021-05-10T04:22:24+5:302021-05-10T04:22:24+5:30

कोल्हापूर : शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या के.एम.टी. कर्मचाऱ्यांचा मार्च २०२० पर्यंतचा पगार तब्बल ३९ दिवसांनी खात्यावर पडला. आता ...

Now waiting for the April salary | आता प्रतीक्षा एप्रिलच्या पगाराची

आता प्रतीक्षा एप्रिलच्या पगाराची

कोल्हापूर : शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या के.एम.टी. कर्मचाऱ्यांचा मार्च २०२० पर्यंतचा पगार तब्बल ३९ दिवसांनी खात्यावर पडला. आता कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पगाराची आस लागून राहिली आहे. तुटपुंज्या पगारामुळे अनेकजण अक्षरश: घाईला आले आहेत. वाढत्या कोरोना संसर्गामुळे शहराअंतर्गत वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्यामुळे ७५० कर्मचारी अत्यावश्यक सेवेत पडेल ते काम करीत आहेत.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची वाहिनी म्हटले तर वावगे ठरणार नाही, अशा कोल्हापूर महानगरपालिकेच्या के.एम.टी. विभागातील कर्मचारी वर्ग उत्पन्न घटल्यामुळे अडचणीत आला आहे. त्याचा थेट परिणाम त्यांच्या पगारावर होऊ लागला आहे. हाताला काम नसल्याने महापालिका प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना पोलिसांसह आरोग्य विभागाच्या मदतीला दिले आहे. यात वाहक असलेल्यांना तर खांद्यावर ऑक्सिजनचे सिलिंडर घेऊन वरचे मजले चढत आहेत. अनेकांना मास्क न घालणाऱ्यांवर कारवाईसाठी दिवसभर रस्त्यावर उभे राहावे लागत आहे, तर काहींना कोरोना रुग्णांच्या नोंदणीचे व औषध वितरणाचे काम करावे लागत आहे. याशिवाय सीपीआर, डीओटी, आयसोलेशन, शहरातील नागरी आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये पडेल ते काम करीत आहेत. मात्र, वेळच्या वेळी पगार हाेत नसल्याने या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. भरीला भर म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून उत्पन्न घटल्याचे कारण देत प्रत्येक वेतनातील २५ टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे. ही कपात केलेली रक्कम यापुढे होणाऱ्या प्रत्येक पगारात अधिकची जमा करून द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून जोर खाऊ लागली आहे.

कर्मचारी वर्ग असा

चालक

कायम स्वरूपी - १६५

बदली (रोजंदारी) - ८९

कत्रांटी कामगार - ५५

वाहक

कायम स्वरूपी - १८०

बदली (रोजंदारी) - ९०

कंत्राटी - २७

कार्यालयीन कर्मचारी - २५

वाहतूक निरीक्षक - ४०

कार्यशाळेतील कर्मचारी संख्या - १००

महिन्याकाठी वेतनावरील खर्च - सुमारे १ कोटी ६० लाख

कोट

के.एम.टी.चे कर्मचारी कोरोना काळात जीव धोक्यात घालून पडेल ते काम करीत आहेत. उत्पन्न घटल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून कपात केलेली रक्कम यापुढील प्रत्येक पगारात जमा करून द्यावी.

कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांना विशेष रजाही मजूर व्हाव्यात. वेळच्या वेळी पगार व्हावेत.

- प्रमोद पाटील, अध्यक्ष, के.एम.टी. कर्मचारी संघटना

Web Title: Now waiting for the April salary