कोल्हापूर : कॅफेंमधील अश्लील चाळ्यांचे प्रकार उघडकीस आल्यानंतर आता भरवस्तीत लॉजमध्ये कुंटणखाने सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुना राजवाडा पोलिसांच्या कारवाईने मसाज पार्लर आणि लॉज चालकांच्या संगनमताने चालणारे गैरप्रकार चव्हाट्यावर आले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी लॉजचे कुंटणखाने बनले आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अशा कुंटणखान्यांवर ऑलआऊट ऑपरेशन राबवावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात सुमारे तीन हजारांहून अधिक लॉज असून, यात अनेक गैरप्रकार चालत असल्याची बातमी 'लोकमत'ने गेल्याच आठवड्यात प्रसिद्ध केली होती. 'शिरोली कांड'च्या निमित्ताने पोलिसांनी कॅफेंमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तपासणीची विशेष मोहीम राबवली. छापेमारीत युगुलांसाठी बंदिस्त कंपार्टमेंट आणि एकांताची व्यवस्था केल्याचे उघडकीस आले. काही ठिकाणी तर बेडचीही व्यवस्था केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले. यानंतर पोलिसांची नजर लॉजमधील कुंटणखान्यांकडे वळली आहे.
जुना राजवाडा पोलिसांनी शिवाजी पेठेतील भरवस्तीत असलेले मसाज पार्लर आणि लॉज चालकाच्या कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. सहा महिन्यांपूर्वी बिनखांबी गणेश मंदिरापासून जवळच असलेल्या एका लॉजमधील कुंटणखान्यावर कारवाई झाली होती. करवीर, पन्हाळा, शिरोली एमआयडीसी, गांधीनगर पोलिसांनीही वारंवार अशा कारवाया करून लॉजमधील कुंटणखाने बंद केले.
मात्र, कुंटणखान्यांचे मूळ उच्चाटन करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. चार दिवसांपूर्वी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाने सदर बाजार येथील एका हॉटेलमध्ये छापा टाकून केलेल्या कारवाईत हायप्रोफाईल वेश्या अड्डा उघडकीस आला. जुना राजावाडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत मसाज पार्लर आणि लॉज चालकांचे संगनमत उघडकीस आले. असे अनेक प्रकार जिल्ह्यात सर्वत्र सुरू असल्याने त्यावर ठोस कारवाई होण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
आंतरराज्यीय कनेक्शन
लॉजमध्ये वेश्या पुरविणाऱ्यांचे आंतरराज्यीय रॅकेट जिल्ह्यात सक्रिय आहे. अनेकदा पश्चिम बंगाल, आसाममधील पीडिता पोलिसांच्या कारवाईत सापडतात. बांगलादेश आणि नेपाळमधील पीडितांचाही यात समावेश असतो. या महिलांना जिल्ह्यात आश्रय देण्यापासून त्यांच्या प्रवासाची व्यवस्था एजंटकडून केली जाते, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
गल्लीपासून जंगलातही लॉज
पर्यटकांचा ओघ वाढत असल्याने शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी लॉज तयार झाले आहेत. जिथे पर्यटक फिरकणार नाहीत अशा ठिकाणीही लॉज आहेत. विशेषत: शाळा, कॉलेजच्या आसपास लॉजची संख्या वाढली आहे. पाचगाव ते कंदलगाव रोड, गिरगाव रोड, कंदलगाव परिसर, उचगाव, कळंबा, बालिंगा परिसर, पन्हाळा रोड, गारगोटी रोड या परिसरात लॉजची संख्या मोठी आहे. कुंटणखान्यांचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांनी ऑलआऊट ऑपरेशन राबवावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
वर्षभरातील कारवाया
- छापा कारवाई - २६
- अटक आरोपी - ६८
- पीडित महिलांची सुटका - ३५
Web Summary : Kolhapur's lodges and cafes are reportedly involved in prostitution and obscene activities. Police raids exposed organized brothels operating within lodges. Locals urge police to conduct all-out operations to curb these illegal activities, revealing interstate trafficking connections.
Web Summary : कोल्हापुर के लॉज और कैफे में वेश्यावृत्ति और अश्लील गतिविधियाँ होने की खबर है। पुलिस छापों में लॉज के अंदर संगठित वेश्यालयों का खुलासा हुआ। स्थानीय लोगों ने पुलिस से इन अवैध गतिविधियों पर अंकुश लगाने के लिए व्यापक अभियान चलाने का आग्रह किया, जिससे अंतरराज्यीय तस्करी कनेक्शन का पता चला।