Mumbai Water Shortage: पश्चिम आशियातील संकटाची परिस्थिती पाहता पेट्रोलियम उत्पादनांचा जपून वापर करावा, असे आवाहन सरकारने केले. तशातच मुंबई महापालिका प्रशासनाकडून आगामी काळात पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरात शुक्रवार, १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. जलाशयांमधील पाणीसाठा घटल्याने खबरदारी म्हणून बृहन्मुंबई प्रशासनाने निर्णय घेतला आहे. सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या अधिकृत एक्स हँडलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा पाणीसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय तसेच भारतीय हवामान खात्याने पुढील वर्षी येणाऱ्या अल निनो व आयओडी बाबत वर्तवलेला अंदाजानुसार कमी मान्सून प्रमाण लक्षात घेता जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार मुंबई महानगरात शुक्रवार, दिनांक १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे विनम्र आवाहन देखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
आज, दिनांक ११ मे २०२६ रोजीची आकडेवारी लक्षात घेता, मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण ३ लाख ४० हजार ३९९ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत सध्या २३.५२ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे अत्यंत बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे. एवढेच नव्हे तर, भातसा धरणातील निभावणी साठ्यातून १,४७,०९२ दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातील निभावणी साठ्यातून २०,००० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. याचाच अर्थ मुंबईसाठी पाणीसाठा उपलब्ध असून मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.
असे असले तरी, वाढलेले तापमान, पर्यायाने वाढणारे बाष्पीभवन आणि पाणीसाठा १० टक्केपेक्षा कमी झाल्यानंतर यापुढेही पाणीपुरवठा नियोजनपूर्वक करता यावा, या सर्व पैलूंचा विचार करून, खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील शुक्रवार दिनांक १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे.
Web Summary : Mumbai will face a 10% water cut from May 15, 2026, due to dwindling reservoir levels. The BMC urges citizens to conserve water. This decision was made as a precautionary measure due to predicted low monsoon and reduced water stock.
Web Summary : मुंबई में जलाशयों के स्तर घटने से 15 मई, 2026 से 10% पानी की कटौती होगी। बीएमसी नागरिकों से पानी बचाने का आग्रह करती है। कम मानसून और घटे पानी के स्टॉक के पूर्वानुमान के कारण यह निर्णय एहतियात के तौर पर लिया गया है।