टोळीयुद्धातून खून करून झारखंडमधून पळाले; कोल्हापुरातील शिये येथे मित्राकडे लपलेल्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:34 IST2025-12-15T12:33:51+5:302025-12-15T12:34:43+5:30
एलसीबीची कारवाई, बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले

टोळीयुद्धातून खून करून झारखंडमधून पळाले; कोल्हापुरातील शिये येथे मित्राकडे लपलेल्या दोघांना अटक
कोल्हापूर : बिहारमधील राहुल पांडे आणि प्रेम यादव या कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीयुद्धातून प्रेम यादव याचा झारखंडमध्ये खून करून पळालेल्या दोन हल्लेखोरांना पोलिसांनी शिये येथील रामनगर परिसरात छापा टाकून पकडले. रोहित राजेश सिंग (वय २३) आणि कुणालकुमार तारकेश्वर मांझी (२०, दोघे रा. मांढरोली, जि. सारण, राज्य बिहार), अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी (दि. १४) सकाळी ही कारवाई केली. आरोपींचा ताबा बिहार पोलिसांकडे देण्यात आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील राहुल पांडे या कुख्यात गुंडाचा खून करून प्रेम यादव हा झारखंडमध्ये लपला होता. त्याचा माग काढून पांडे टोळीतील तीन गुंडांनी झारखंड राज्यातील धनबाद येथे १८ नोव्हेंबर रोजी प्रेम यादव याचा डोक्यात गोळ्या झाडून खून केला होता. घटनेनंतर तिन्ही आरोपी पसार होते.
हल्लेखोर रोहित सिंग आणि कुणालकुमार मांझी हे दोघे कोल्हापूर जिल्ह्यात लपल्याची माहिती बिहार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बिहार पोलिसांनी कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्याशी संपर्क साधून आरोपींना पकडण्याची विनंती केली.
तीन ठिकाणी छापे
आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी तामगाव, शिरोली आणि शिये येथे छापेमारी केली. यावेळी दोन्ही आरोपी शिये येथील रामनगर परिसरात कमानीजवळ एका मित्राकडे राहत असल्याची माहिती मिळताच त्यांना पकडले. दोन्ही आरोपींवर खून, जबरी चोरी, हाणामारीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वी ते शिये येथे गावाकडील मित्राकडे आले होते. सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, अंमलदार राम कोळी, सुरेश पाटील, विनोद कांबळे, रूपेश माने, अरविंद पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.
आरोपींचा सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात वावर
अटकेतील रोहित सिंग याचे आई-वडील सातारा येथे राहतात. तो १४ वर्षे साताऱ्यात राहत होता. सात-आठ वर्षांपूर्वी तो गावाकडे आजी-आजोबाकडे गेला होता. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात त्याचा वावर होता. त्याच्या गावाकडील काही तरुण इकडे एमआयडीसीत काम करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.