कबनूर खून प्रकरणातील संशयितांना मोक्का लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:37+5:302021-02-05T06:53:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील संदीप मागाडे खून प्रकरणातील संशयित ग्रा.पं. सदस्य कुमार कांबळे व ...

कबनूर खून प्रकरणातील संशयितांना मोक्का लावा
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील संदीप मागाडे खून प्रकरणातील संशयित ग्रा.पं. सदस्य कुमार कांबळे व त्याच्या के.के. टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी नातेवाईक व ग्रामस्थांनी गुरुवारी येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. हा मोर्चा कबनूर समाज भवनापासून प्रांत कार्यालयावर आल्यानंतर तेथे सभेत रूपांतर झाले. सभेत ग्रा.पं. सदस्य सुलोचना कट्टी व शोभा पोवार यांनी संबंधित संशयित आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. प्रांत कार्यालयात दिलेल्या निवेदनात, कबनूर ग्रामपंचायत निवडणुकीत कुमार कांबळे याच्याविरोधात सत्यम कांबळे अशी वॉर्ड क्र. ५ मधून लढत होती. सत्यम यांच्या प्रचारात संदीप मागाडे हा आघाडीवर होता. त्यावेळी त्याला कुमार कांबळे याने प्रचार करू नये, असे म्हणून ठार मारण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, निवडून आल्यानंतर कुमार कांबळे व त्याच्या के.के. टोळीने किरकोळ कारणावरून झालेला वाद मिटविण्याचे कारण सांगून बोलावून घेतले व आधीचा राग मनात धरत संदीप याचा खून केला असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर संबंधित सर्व संशयित आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, गावामध्येही त्यांची दहशत आहे. याची संपूर्ण चौकशी करून या टोळीवर मोक्का लावावा, अशी मागणी केली. मोर्चामध्ये प्रमोद पाटील, नितीन कामत, अभिजित कांबळे, उमाजी पाटील, नारायण फरांडे, नेताजी कांबळे, सुहास कांबळे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
(फोटो ओळी) २८०१२०२१-आयसीएच-०१
संदीप मागाडे याचा निर्घृण खून करणाऱ्या ग्रा.पं. सदस्य कुमार कांबळे व त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी कबनूर (ता. हातकणंगले) येथील ग्रामस्थांनी गुरुवारी इचलकरंजीत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.
(छाया - उत्तम पाटील)