मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचं बघावं, 'गोकुळ'मध्ये राजाचं राजकारण नसावं - रोहित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 18:56 IST2025-05-20T18:54:05+5:302025-05-20T18:56:15+5:30

कोल्हापूर : ‘ गोकुळ’ची निवडणूक कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी इथे लक्ष घालू नये, त्यांना विनंती करतो ...

MLA Rohit Pawar directly advised the Chief Minister not to get involved in Gokul politics | मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचं बघावं, 'गोकुळ'मध्ये राजाचं राजकारण नसावं - रोहित पवार 

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचं बघावं, 'गोकुळ'मध्ये राजाचं राजकारण नसावं - रोहित पवार 

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची निवडणूक कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी इथे लक्ष घालू नये, त्यांना विनंती करतो की, निवडणुकीत जे ठरलेय त्यानुसारच झाले तर संस्थेसाठी चांगले आहे. ‘गोकुळ’च्या माध्यमातून राजकारणावर पकड निर्माण करणे योग्य नाही. शेतकऱ्यांचा विचार करून यामध्ये राजकारण आणू नये, असा सल्ला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी दिला. ते सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.

पवार म्हणाले, गोकुळ ही शेतकऱ्यांची संस्था आहे, राजकीय नेत्यांची नव्हे. गोकुळची निवडणूक झाली तेव्हा कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली गेली नव्हती. त्यामुळे येथील नेत्यांनी जो फॉर्म्युला ठरवला आहे, त्या पद्धतीनेच बदल होणे महत्त्वाचे आहे. ही एक चांगली चाललेली संस्था आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून या जिल्ह्यावर आपली राजकीय पकड मजबूत करण्यासाठी भाजपचे नेतृत्व वापर करत आहे, ते लोकांना आवडणार नाही.

लोकांचा विचार करून यामध्ये राजकारण आणू नये. मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की जे ठरलंय त्यानुसारच झाले तर संस्थेसाठी ते चांगले राहील. शब्द देऊन सुद्धा जर सत्तेचे राजकारण केले जात असेल तर ते योग्य नाही. विद्यमान संचालकांनी गोकुळमध्ये नेते काय म्हणतात यापेक्षा शेतकरी काय म्हणतात हे पाहून निर्णय घ्यावा, ‘वरून’ फोन आला म्हणून निर्णय बदलत असेल तर लोक त्यांच्यावर शंका घेतील. त्यांना पुढील काळात राजकारणामध्ये मोठी अडचण येऊ शकते. त्यामुळे जे ठरलेय तेच घडावे.

सतेज पाटील यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न

सत्तेच्या विरोधात जी व्यक्ती लढते, त्या व्यक्तीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. पण विरोधकांना किती ताकद लावायची तेवढी लावू द्या, निवडणूक होईल तेव्हा मात्र सतेज पाटील यांना कोणाचीही मदत लागणार नाही. सतेज पाटील आणि शेतकऱ्यांची बाजू घेणाऱ्या चांगल्या प्रतिनिधींना ‘गोकुळ’च्या येत्या निवडणुकीत खूप चांगले यश मिळेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

रोहित पवार यांनी कोल्हापुरात येऊन मुख्यमंत्र्यांना सल्ले देणे त्यांनी बंद करावे. सांगलीच्या वसंतदादा कारखान्यात राजकारणाचे तुमचे अड्डे चालतात. बारामतीतील अनेक संस्थांमध्येही तुमचे राजकीय हस्तक्षेप आहेत. गोकुळ ही चांगली चाललेली सहकारी संस्था आहे. त्यामुळेच भविष्यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षांसोबत ‘गोकुळ’च्या निवडणुकीत एकत्र येतील. - नाथाजी पाटील, जिल्हाध्यक्ष, भाजप

Web Title: MLA Rohit Pawar directly advised the Chief Minister not to get involved in Gokul politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.