Kolhapur: 'डिबेंचर'प्रश्नी दूध उत्पादकांचा 'गोकुळ'वर मोर्चा; कार्यालयात जनावरे घुसवली, आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 13:51 IST2025-10-16T13:49:46+5:302025-10-16T13:51:58+5:30
आंदोलकांनी गोकुळच्या कार्यालयात जनावरे घुसवण्याचा प्रयत्न केला

Kolhapur: 'डिबेंचर'प्रश्नी दूध उत्पादकांचा 'गोकुळ'वर मोर्चा; कार्यालयात जनावरे घुसवली, आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला गालबोट लागले. आंदोलकांनी जनावरे संघाच्या मुख्य प्रवेशव्दारातून आत घुसवण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी रोखले. त्यानंतर पोलिस व आंदोलकांमध्ये अक्षरश: राडा झाला. आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. अखेर दार ढकलून आंदोलनकर्ते आत घुसल्यानंतर एकच गोंधळ उडाला.
संघाने दिवाळी दूध दरफरकातून डिबेंचर कपात केल्याने दूध संस्था प्रतिनिधींमध्ये असंतोष आहे. कपात केलेली रक्कम परत करा, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. शासकीय विश्रामगृह आवारातून म्हैशी व गायी घेऊन संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयाच्या दारात मोर्चा आल्यानंतर आंदोलकांनी प्रवेशव्दाराच्या दारांना म्हैस बांधली. त्यांना रोखल्यानंतर गोंधळ उडाला. याच दरम्यान, पोलिस व आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट उडाली. एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने पोलिसांनी लाठीहल्ला केला.
बराचवेळ झटापट सुरू राहिल्यानंतर दार ढकलून आंदोलनकर्ते जनावरांसह आत घुसल्यानंतर एकच गोंधळ उडाला. शाैमिका महाडिक यांनी आंदोलनकर्त्यांना शांत केल्यानंतर संचालकांसोबत चर्चेसाठी त्यांच्यासह शिष्टमंडळ आत गेले. यावेळी ‘गोकुळ’चे माजी संचालक विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, ‘राजाराम’ कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, संचालक तानाजी पाटील, ‘भोगावती’चे माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील आदी सहभागी झाले होते.
दरम्यान, डिबेंचरची तरतूद झालेली आहे. तरीही दूध उत्पादकांना काहीतरी देण्याची मानसिकता संचालक मंडळाची असून, उत्पादकांना कसे देता येईल, याबाबत आज, शुक्रवारी जाहीर करण्याचे आश्वासन ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्ते तेथून निघून गेले.
‘जय श्रीराम, जय शिवाजी जय भवानी’च्या घोषणा
आंदोलनकर्ते आत आल्यानंतर ‘जय श्रीराम’, ‘जय शिवाजी जय भवानी’ यासह ‘वाचवा रे वाचवा गोकुळ वाचवा’, ‘डिबेंचर आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’, महादेवराव महाडिक व शौमिका महाडिक यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
नासधूस करणारे आम्ही नव्हे ते होते
‘गोकुळ’वर प्रेम करणारे आम्ही दूध उत्पादक आहोत. नासधूस करणारे आम्ही नाही. मागील पंचवार्षिकमध्ये कोणी कुंड्या फोडल्या? अशी विचारणा प्रताप पाटील-कावणेकर यांनी केली.
..तर भावाचा कान पिळू
होय, अध्यक्ष (नविद मुश्रीफ) माझा लाडका भाऊ आहे, मी त्यांची मोठी बहीण आहे. जिथे ते चांगले काम करतील तिथे शाब्बासकी देऊ. पण, चुकीच्या कारभारावेळी कान पिळण्यास मागेपुढे बघणार नाही, असा दमच शौमिका महाडिक यांनी भरला.
महायुतीत मी मिठाचा खडा टाकलेला नाही
हा मोर्चा मी स्वत: काढलेला नाही, मी ‘गोकुळ’च्या विरोधात बोललेले नाही. दूध उत्पादक माझ्याकडे निवेदन घेऊन आले, मी त्यांच्यासोबत यावे, अशी त्यांची इच्छा होती. मी महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा मिठाचा खडा टाकलेला नाही. आज मी येथे विश्वस्त म्हणून बसले ते दूध संस्था प्रतिनिधींनी मतदान केल्यामुळे. त्यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीतर मला विश्वस्त म्हणून घेण्याचा अधिकार नसल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.