प्रशासक असलेल्या अनेक पतसंस्थांचे लेखापरीक्षणच नाही; अपहारावर पांघरूण : संचालक सहीसलामत..ठेवीदार वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST2021-02-10T04:23:43+5:302021-02-10T04:23:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भुदरगड सहकारी पतसंस्थेसारख्या अवसायानात गेल्यानंतर प्रशासक मंडळ नियुक्त असलेल्या अनेक पतसंस्थांचे गेल्या कित्येक वर्षांत ...

Many credit unions with administrators are not even audited; Covering embezzlement: The director is safe | प्रशासक असलेल्या अनेक पतसंस्थांचे लेखापरीक्षणच नाही; अपहारावर पांघरूण : संचालक सहीसलामत..ठेवीदार वाऱ्यावर

प्रशासक असलेल्या अनेक पतसंस्थांचे लेखापरीक्षणच नाही; अपहारावर पांघरूण : संचालक सहीसलामत..ठेवीदार वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : भुदरगड सहकारी पतसंस्थेसारख्या अवसायानात गेल्यानंतर प्रशासक मंडळ नियुक्त असलेल्या अनेक पतसंस्थांचे गेल्या कित्येक वर्षांत लेखापरीक्षणच झालेले नाही. त्यामुळे या संस्थांमध्येही भुदरगडसारखाच अपहार झाला आहे का हे गुलदस्त्यातच राहिले आहे.

भुदरगड पतसंस्थेतील अपहाराबाबत तक्रारी झाल्यानंतर थेट सहकार आयुक्त कार्यालयाकडून लेखापरीक्षणाचे आदेश आले. त्यामुळे जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालयाने मोहीम राबवून हे लेखापरीक्षण पूर्ण केले. परंतु आता अपहार केलेल्या दोषी कर्मचाऱ्यांविरुध्द प्रत्यक्षात फौजदारी गुन्हे कधी दाखल होणार आणि त्यानंतर पोलीस खात्याकडून त्यांच्यावर अटकेची कारवाई कधी होणार याला अजून किती वर्षे लागतील हे कुणालाच सांगता येत नाही. लेखापरीक्षक लेखापरीक्षण करतात. अपहार शोधून काढतात. त्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जातात. परंतु, पुढे काहीच होत नसल्याचा अनुभव आहे. ज्यांचा अपहारातील प्रत्यक्ष सहभाग चौकशीत स्पष्ट झाला आहे, त्यांच्यावरही राजकीय दबावातून काहीच कारवाई झाली नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे ही कारवाई अनेकदा वृत्तपत्रांतील बातम्यांपुरतीच मर्यादित ठरते. त्याविरोधात सातत्याने पाठपुरावा करणारे कोण नसेल तर पोलीस खात्याकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याचा सर्रास अनुभव आहे.

ज्या पतसंस्था गैरव्यवहार व गैरकारभाराच्या तक्रारीवरून अवसायानात गेल्या, त्यावरील संचालक मंडळ बरखास्त करून सहकार खात्याने सहाय्यक निबंधक दर्जाचे प्रशासक नियुक्त केले आहेत. परंतु त्या संस्थांचे लेखापरीक्षण झालेले नाही. वाहनधारक पतसंस्था, विठ्ठलाई महिला, महालक्ष्मी गृहतारण, बाबुराव महाजन पतसंस्था अशी त्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. सहकार खात्याकडे त्यासाठीचे पुरेसे मनुष्यबळ नाही व त्यांची इच्छाशक्तीही नसल्याचे अनेक प्रकरणात दिसून आले आहे.

भुदरगड पतसंस्थेत शाखाधिकाऱ्यांनी ज्यांच्या नावे गैरव्यवहार केला त्यांची नावे अशी

साईक्स एक्सटेन शाखा :

अरुण शामराव पाटील (मयत), सुधाकर बळवंत पाटील, शिवप्रसाद बाबुराव गवळी, सुचेता दत्तात्रय सामंत, मुग्धा देवीदास तेंडुलकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नंदाताई पोळ यांच्या नावावरील रकमेचा अपहार केला आहे. या शाखेतील ७ लाख ४३ हजार रुपयांच्या शिल्लक स्टेशनरीचाही अपहार झाल्याचे अहवालात म्हटले आहे. परंतु या स्टेशनरीला वाळवी लागली होती. पावसाने ती खराब झाली होती व चोरट्यांनी लंपास केल्याने वरिष्ठांच्या सूचनेवरूनच ती नफा-तोटा खाती खर्च टाकल्याचे शाखाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

कुडाळ शाखेतील गैरव्यवहार

कुडाळ शाखेतील ४९ ठेवीदारांच्या नावावरील किमान १४ हजार ५३२ ते ६ लाख ९४ हजार ५४२ इतक्या रकमा उचलल्या आहेत. हीच एकत्रित रक्कम ९६ लाख ३२ हजार इतकी होती. रक्कम ठेवीदारांच्या बचत खात्यावर जमा करून ती नंतर त्यांची बनावट सही करून उचलली आहे. ज्यांच्या सह्या आहेत त्यांची रुजवात घातली असता त्यांनी ही आपली सही नसून पैसेही मिळाले नसल्याचे सांगितल्याने हा गैरव्यवहार उघड झाला आहे. सुहासिनी दिगंबर राणे यांचे मशिनरी तारण नजरगहाण कर्ज खात्यास ३१ मार्च २०१७ अखेर ६ लाख ९४ हजार ५४२ इतकी रक्कम येणे दिसत आहे. मात्र, प्रत्यक्षात तत्पूर्वीच कणकवली सरपंच व ग्रामसेवकांनी राणे यांनी ३ लाख २५ हजार कर्ज पूर्ण भागवले असून स्थावर मिळकतीचा बोजा कमी करण्यासाठी पत्र दिले आहे. त्यानुसार बोजा कमी झाल्याचा कणकवली नगरपंचायतीचा मालमत्ता उतारा सादर केला आहे. याचा अर्थ राणे यांनी कर्ज परतफेड करण्यासाठी भरणा केलेली रक्कम संस्थेकडे व त्यांच्या खात्यावर जमा न करता त्याचा अपहार केला आहे. अशाच स्वरुपाची इतरही प्रकरणे आहेत.

(उत्तरार्ध)

Web Title: Many credit unions with administrators are not even audited; Covering embezzlement: The director is safe