आजरा :
आजरा-आंबोली रोडवर एमआयडीसीजवळ बोलेरो व मोटरसायकलच्या अपघातात हैदर युसूफ शेख (रा. खडकी, पुणे) हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला; मात्र बोलेरोचे चालक जयसिंगराव देसाई (रा. वेळवट्टी) यांनी प्रसंगावधान राखत हैदर शेख याला बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला; मात्र अपघातस्थळी दुचाकी जळून खाक झाली. आज सकाळी १०.३० वाजता सुमारास हैदर शेख हे आपल्या मोटरसायकलवरून पुण्याहून गोव्याकडे तर जयसिंगराव शंकरराव देसाई हे आपल्या बोलेरो गाडीने आजऱ्याकडे येत होते. एम.आय.डी.सीजवळ या दोन वाहनांत जोराची धडक झाली.
अपघातानंतर बोलेरो गाडी विरुद्ध दिशेला तर हैदर शेख रस्त्याच्याकडेला गाडीसह पडला. अपघातानंतर मोटारसायकलने पेट घेतला. तातडीने जयसिंगराव देसाई यांनी हैदर शेख याला गाडीपासून बाजूला काढले.
अपघातात शेख याचा उजवा पाय गुडघ्यापासून खाली तीन ठिकाणी मोडला आहे. अपघातस्थळी प्रचंड रक्तस्राव झाला होता. गाडीने पेट घेतल्यानंतर शेख यांच्या अंगावरील जॅकेट व सॅकनेही पेट घेतला; परंतु नागरिकांनी तातडीने ते विझविले. गंभीर जखमी हैदर शेख याला गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. अपघाताची नोंद आजरा पोलिसात झाली आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल विशाल कांबळे करीत आहेत.
-----------------------------
* हेल्मेटमुळे वाचला जीव
मोटरसायकलस्वार हैदर युसूफ शेख यांनी हेल्मेट घातले होते. हेल्मेटमुळे जीव वाचला; पण पायाला गंभीर दुखापत झाल्याने शेख याची प्रकृती गंभीर झाली होती. त्याला तातडीने गडहिंग्लजच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. --------------------------
* फोटो ओळी : आजऱ्याजवळील अपघातानंतर मोटरसायकलला लागलेली आग. दुसऱ्या छायाचित्रात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या मोटरसायकली. क्रमांक : १९०१२०२१-गड-०४/०५.