Kolhapur Politics: विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुती मजबूत; काँग्रेसचे गणित बिघडले, पक्षनिहाय संख्याबळ..जाणून घ्या
By राजाराम लोंढे | Updated: February 10, 2026 14:14 IST2026-02-10T14:13:22+5:302026-02-10T14:14:33+5:30
स्थानिक आघाड्यांकडे १३० जागांची रसद

संग्रहित छाया
राजाराम लोंढे
कोल्हापूर : पावणे दोन वर्षांनी होणाऱ्या कोल्हापूर विधानपरिषद मतदारसंघातील निवडणुकीवर महायुतीने आपली मजबूत पकड घेतली आहे. नगरपालिका, नगरपंचायती, महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे सभापती अशा ४९० पैकी ३२१ मतदान महायुतीकडे आहेत. यामध्ये भाजपकडे सर्वाधिक ११८ मते असल्याने त्यांचाकडून उमेदवारीचा दावा होऊ शकतो. स्थानिक आघाड्यांकडे १३०, तर काँग्रेसकडे ७१ मते आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील काँग्रेसचे गणित बिघडले असून, महायुतीची पकड घट्ट झाली आहे.
विधानपरिषदेचे विद्यमान आमदार सतेज पाटील यांची मुदत नोव्हेंबर २०२७ मध्ये संपत आहे. मागील निवडणुकीत ऐन वेळी भाजपचे अमल महाडिक यांनी माघार घेतल्याने सतेज पाटील बिनविरोध निवडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेत गेले होते. गेल्या पाच वर्षात राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. महायुतीची राज्यात पकड मजबूत आहे, तर काँग्रेस एकाकी दिसत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यात झालेल्या नगरपालिका, नगरपंचायती, कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे.
काँग्रेसने सर्वच ठिकाणी एकाकी झुंज देत आपला दबदबा कायम ठेवला असला तरी महायुतीच्या ताकद मोठी आहे. त्यातही भाजपने जोरदार मुसंडी मारत नगरपालिका व महापालिका निवडणुकीत तब्बल १०३ जागा जिंकल्या आहेत. त्यांच्या पाठोपाठ कॉग्रेस ५४, तर शिंदेसेना ४३ व राष्ट्रवादी अजित पवार गटाने ४०, तर जनसुराज्य पक्षाने २६जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे येथे महायुतीचे २१२ नगरसेवक हाेतात. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने नेत्रदीपक यश संपादन करत नंबर वनचे स्थान घेतले. भाजप, शिंदेसेना, जनसुराज्यनेही आपली ताकद दाखविली आहे. त्याशिवाय आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘शाहू’ ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्यासह नगरपालिकांमधील स्थानिक आघाड्यांची ताकदही महायुतीला मिळणार असल्याने त्यांचे विजयाचे गणित अधिक सोपे होणार आहे.
यड्रावकर राहणार किंगमेकर
शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यांच्याकडे विधानपरिषदेसाठी निर्णायक ताकद आहे. त्यांच्याकडे शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड नगरपालिकांचे ५० नगरसेवक, तर जिल्हा परिषदेचे ४ व शिरोळ पंचायत समितीचा सभापती अशी ५५ इतकी मते असल्याने ते या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत राहू शकतात.
अशी आहे पक्षांची विधानपरिषदेची ताकद
| पक्ष | नगरपालिका | कोल्हापूर मनपा | इचलकरंजी मनपा | जिल्हा परिषद | पंचायत समिती सभापती | एकूण |
| भाजप | ३४ | २६ | ४३ | १२ | ०३ | ११८ |
| काँग्रेस | २० | ३४ | ०० | १४ | ०२ | ७१ |
| राष्ट्रवादी | ३५ | ०४ | ०१ | २० | ०३ | ६३ |
| शिंदेसेना | २५ | १५ | ०३ | ०९ | ०१ | ५३ |
| उद्धवसेना | ०८ | ०१ | ०१ | ०१ | ०० | ११ |
| जनसुराज्य | २५ | ०१ | ०० | ०५ | ०१ | ३२ |
| अपक्ष | १५ | ०० | ०० | ०१ | ०० | १६ |
| जनता दल | ०३ | ०० | ०० | ०० | ०० | ०३ |
| स्थानिक आघाड्या | १०८ | ०० | १७ | ०५ | ०१ | १३० |