Kolhapur Politics: आपला पक्ष, मतदारसंघ करा सेट; मंत्री, खासदार, आमदारांना ‘टार्गेट’
By समीर देशपांडे | Updated: October 17, 2025 16:42 IST2025-10-17T16:42:09+5:302025-10-17T16:42:56+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेत्यांची कसोटी

Kolhapur Politics: आपला पक्ष, मतदारसंघ करा सेट; मंत्री, खासदार, आमदारांना ‘टार्गेट’
समीर देशपांडे
कोल्हापूर : पालकमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार पदांवर असणाऱ्या सर्वच नेत्यांवर कोणत्याही परिस्थितीत आपला पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ‘सेट’ करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. पक्ष जर तुम्हाला मोठी पदे देत असेल तर तुमचेही पक्षाप्रती तितकेच योगदान आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने या सर्वच नेत्यांची येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत आणि कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका निवडणुकीत कसोटी लागणार आहे.
भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून जरी राज्यात एकत्रित असले तरी प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्यासाठी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात २०१४ पासून भाजपने दोन्हीकाँग्रेसना खिंडार पाडायला सुरुवात केली. तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रक्रियेला अधिक वेग देत अनेक वजनदार नेते आपल्या पक्षात घेतले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यासाठी आघाडीवर आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही काही निर्णायक प्रवेश घडवून आणले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमधील तीनही पक्ष आपापल्या परीने ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आमदार विनय कोरे यांचेही शांतपणे यासाठीचे प्रयत्न सुरूच आहेत.
कोणत्याही निवडणुकीत सक्रियपणे उत्तरून एकतर वाटाघाटीच्या माध्यमातून किंवा संघर्ष करून पदे मिळवली तरच पक्ष विस्तारित होऊ शकतो. हेच ओळखून येणाऱ्या तीनही निवडणुकांच्या माध्यमातून आगामी लोकसभा, विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच वाटाघाटीवेळी आपण फार मागे राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
महापौरदाची शिंदेसेना, भाजपला घाई
कोल्हापूरचा पहिला महापौर करण्याची घाई भाजपला आणि शिंदेसेनेला झाली आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली आहे. जागा वाटपाचे आकडेही जाहीर केले जात आहे. यामध्ये हसन मुश्रीफही मागे नाहीत. सध्या जादा जागा पदरात पाडून घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुणावतेय
राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही महायुतीच्या तीनही पक्षांना खुणावत आहे. आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपने हे पद भूषविले आहे. त्यामुळे शिंदेसेना या पदासाठी पहिल्यापासून आक्रमक राहणार आहे.
आपापल्या मतदारसंघातील पालिका ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न
जिल्ह्यातील पालकमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार आपल्या मतदारसंघातील नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायती अशा १३ पैकी अधिकाधिक जागी आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष व्हावा यासाठी राबणार आहेत.
जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय स्थिती
खासदार
काँग्रेस - ०१ / शाहू छत्रपती
भाजप - ०१ / धनंजय महाडिक
शिंदेसेना - ०१ / धैर्यशील माने
आमदार
शिंदेसेना आणि समर्थन दिलेले आमदार - ०४
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर
भाजप आणि समर्थन दिलेले आमदार - ०३
आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील
जनसुराज्यचे आमदार - ०२
आमदार विनय कोरे, आमदार अशोकराव माने
काँग्रेसचे आमदार २
आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर
राष्ट्रवादीचे आमदार -०१
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ