Kolhapur Crime: सख्ख्या भावांमध्ये शेतजमिनीचा वाद, पुतण्यांनी चुलत्यावर केला तलवार हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:34 IST2025-11-18T13:33:25+5:302025-11-18T13:34:22+5:30
चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा सुरू होता प्रयत्न, तोच..

Kolhapur Crime: सख्ख्या भावांमध्ये शेतजमिनीचा वाद, पुतण्यांनी चुलत्यावर केला तलवार हल्ला
हुपरी : पट्टणकोडोली रोडवरील हाॅटेल शिवमुद्राजवळ चारचाकी गाडीने आलेल्या पुतण्यांनी तात्याची मोटारसायकल थांबवून गाडीवरून उतरत असताना तलवारीसारख्या हत्याराने खुनी हल्ला केला. यामध्ये सतार मुल्लाणी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडला आहे. या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुदरगड तालुक्यातील कडगाव येथे वडिलोपार्जित जमीन होती. कोल्हापूर येथील भावाने जमिनीची परस्पर विक्री केल्यामुळे दोन सख्ख्या भावांमध्ये आंतरिक वाद निर्माण झाला होता. भाऊ या नात्याने त्या जमिनीच्या निम्म्या हिश्शाच्या रकमेची मागणी करत होता. या अनुषंगाने रफिक व निजाम मुल्लाणी यांच्यात राजारामपुरी येथील घरांमध्ये चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू होता.
चर्चा अपयशी ठरल्यावर घरी परतताना चारचाकी वाहनातून आलेल्या पुतण्यांनी चुलत्याला थांबण्याचा इशारा दिला आणि गाडीवरून उतरत असताना तलवारीसारख्या हत्याराने हातावर व डोक्यावर वार केले. जखमी सतार निजाम मुल्लाणी (वय ५५, रा. वाळवेकर नगर, हुपरी) यांनी ही फिर्याद दिली आहे.
आरोपी आरिफ रफिक मुल्लाणी, अजिज रफिक मुल्लाणी, आरिफ तुरेवाले (सर्व रा. बाईचा पुतळा, राजारामपुरी, कोल्हापूर) यांच्याविरुद्ध हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.