‘कुमावत’चे बँकेत रूपांतर होईल

By Admin | Updated: November 27, 2014 23:55 IST2014-11-27T23:36:14+5:302014-11-27T23:55:40+5:30

डी. वाय. पाटील : नूतन वास्तूचे गंगावेश येथे उद्घाटन

'Kumavat' will be converted into a bank | ‘कुमावत’चे बँकेत रूपांतर होईल

‘कुमावत’चे बँकेत रूपांतर होईल

कोल्हापूर : कुंभार समाजाने केलेली प्रगती अतुलनीय आहे. अखंडपणे ७३ वर्षे चालविलेल्या ‘कुमावत क्रेडिट सोसायटी’चे रूपांतर बँकेत होईल, असे मत बिहारचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी आज, गुरुवारी सायंकाळी व्यक्त केले. ते गंगावेश येथील कुमावत को-आॅप. के्रडिट सोसायटीच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन समारंभप्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष व माजी महापौर मारुतराव कातवरे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, समाजात कर्तृत्वाने माणसे मोठी होतात. माणसाने अहंकार सोडला तर जगात सर्व काही मिळते. माणसाचे बाह्य व अंतर्मनाचे नाते हे शेतकऱ्याचे जसे जमिनीशी असते, तसे असते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शरद पवार यांनी सहकारात उत्कृष्ट काम केले आहे. १९९० ला मी राजकारणातून निवृत्त झालो, असे सांगून ते म्हणाले, बँका, पतसंस्था यांचे मोठे काम आहे; पण ते टिकवून ठेवणे आव्हान आहे. शत्रुत्व नष्ट करा, असे आवाहन डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी, कुंभार समाजाचे व या क्रेटिड सोसायटीचे जे प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले. प्रा. संजय मंडलिक म्हणाले, कुंभार समाजाच्या विविध अडचणी व समस्या वेळोवेळी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी सोडविल्या आहेत. ही के्रडिट सोसायटी या समाजातील गरजूंना आर्थिक मदत करते. त्यामुळे या समाजातील व्यक्तींना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
मारुतराव कातवरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समारंभास अ‍ॅड. रामचंद्र कुंभार, बबन वडणगेकर, मनोहर पाडळकर, लक्ष्मण आरेकर, राजाराम कुंभार (आर.जी.), राजाराम मा. कुंभार (म्हारुळकर), जनार्दन कांबळे, लक्ष्मीबाई कातवरे यांच्यासह कुंभार समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: 'Kumavat' will be converted into a bank