कूरच्या शेतकऱ्याचा मुलगा ठरला ‘कुलदीप’

By Admin | Updated: July 5, 2015 01:04 IST2015-07-05T01:04:07+5:302015-07-05T01:04:07+5:30

सरूडच्या अजित कुंभारचेही यश : ‘यूपीएससी’ परीक्षेत यश : प्रशिक्षण केंद्राचेही दोघे उत्तीर्ण

Kuldeep becomes son of Koor farmers | कूरच्या शेतकऱ्याचा मुलगा ठरला ‘कुलदीप’

कूरच्या शेतकऱ्याचा मुलगा ठरला ‘कुलदीप’

कोल्हापूर/गारगोटी/सरूड : कूर (ता.भुदरगड) येथील शेतकऱ्याच्या मुलाने तर सरूड (ता. शाहूवाडी) येथील सेवा निवृत्त शिक्षकाच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अव्दितीय यश मिळवले आहे. कूरच्या कुलदीप शिवाजी कुंभार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) घेतलेल्या परीक्षेत ८६७ वे स्थान पटकावले. तर सरूडच्या अजित बाळासो कुंभार २९२ क्रमांकाने या परीक्षेत यशस्वी झाला आहे.
कुलदीप कुंभार यांचे वडील शिवाजी कुंभार हे शेतकरी आहेत. केवळ सव्वा एकर शेती असलेल्या कुंभार कुटुंबीयांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. कुलदीपने कोल्हापुरातील एस. एम. लोहिया महाविद्यालयातून बारावी विज्ञानपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर रसायनशास्त्र विषयातून बिद्री येथील दूधसाखर महाविद्यालयातून बी. एस्सी ही पदवी संपादन केली. निकाल जाहीर होताच वडील व त्याचा मित्रपरिवारातील सदस्य कुलदीपचे अभिनंदन करण्यासाठी दुपारी पुण्याकडे रवाना झाले.
सरूड (ता. शाहूवाडी) येथील अजित कुंभार हा हैद्राबाद येथे भारतीय पोलीस सेवेच्या प्रशिक्षणासाठी आहे. गेल्या वर्षीही त्याने ही परीक्षा ५८८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. गेल्या वर्षी तो आय.पी.एस. झाला होता. प्राथमिक शिक्षण सरूडमध्ये तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सागाव (ता. शिराळा) मध्ये व महाविद्यालयीन शिक्षण कराड येथे झाले आहे. त्याचे वडील
सेवानिवृत्त शिक्षक आहेत, तर आई गृहिणी आहे.
कोल्हापूर येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील राहुल काशीनाथ कर्डिले आणि प्रशांत बाळासाहेब गांधले यांनी अनुक्रमे ४२२ व ७८१ वे स्थान पटकावले. राहुल कर्डिले हे सध्या दुय्यम उपनिबंधक - वर्ग १ या पदावर कार्यरत आहेत; तर प्रशांत बाळासाहेब गांधले हे गटविकास अधिकारी वर्ग - २ या पदावर कार्यरत आहेत.

Web Title: Kuldeep becomes son of Koor farmers