Kolhapur-Local Body Election: गडहिंग्लजमध्ये ‘राष्ट्रवादी’ विरूद्ध ‘महायुती’ यांच्यातच सामना, नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:25 IST2025-11-22T16:24:56+5:302025-11-22T16:25:20+5:30
३ प्रभागांत ३ पक्षांत बंडखोरी

Kolhapur-Local Body Election: गडहिंग्लजमध्ये ‘राष्ट्रवादी’ विरूद्ध ‘महायुती’ यांच्यातच सामना, नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी लढत
गडहिंग्लज : गडहिंग्लजमध्ये ‘राष्ट्रवादी’ विरूद्ध ‘महायुती’ यांच्यातच चुरशीचा दुरंगी सामना होत आहे. ‘महायुती’मध्ये जनता दल, जनुसराज्य, भाजपा, शिंदे सेना, काँग्रेस हे पक्ष एकत्र आले आहेत. ‘मनसे’च्या महिला उमेदवाराला राष्ट्रवादीने पुरस्कृत केले असून, उद्धव सेना केवळ १ जागा स्वतंत्र लढवत आहे. नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदांच्या २२ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी ‘राष्ट्रवादी’चे महेश तुरबतमठ व ‘महायुती’चे गंगाधर हिरेमठ यांच्यातच खरा दुरंगी सामना होईल. त्यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश कांबळे, राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार विनोद बिलावर यांचे आव्हान आहे. याशिवाय वीरसिंग बिलावर व सचिन साबळे हे अपक्षही रिंगणात आहेत.
‘महायुती’चे नेतृत्व आमदार डॉ. विनय कोरे, मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार शिवाजीराव पाटील, माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी तर ‘राष्ट्रवादी’चे नेतृत्व मंत्री हसन मुश्रीफ करीत आहेत.
नगराध्यक्ष पदाच्या रिंगणातून १३ पैकी ७ उमेदवारांनी तर नगरसेवक पदाच्या रिंगणातील ७८ पैकी २६ उमेदवारांनी माघार घेतली. तहसीलदार ऋषिकेत शेळके हे निवडणूक निर्णय अधिकारी तर मुख्याधिकारी देवानंद ढेकळे हे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
३ प्रभागांत ३ पक्षांत बंडखोरी
राष्ट्रवादीचे रमजान अत्तार यांनी ‘प्रभाग २ अ’मध्ये तर जनता दलाचे माजी नगराध्यक्ष बापू म्हेत्री यांची कन्या पूनम म्हेत्री यांनी ‘प्रभाग १ अ’ मध्ये तर ‘प्रभाग ६ अ’मध्ये भाजपाच्या आशा देवार्डे यांनी बंडखोरी केली आहे. उद्धव सेनेच्या माजी नगरसेविका श्रद्धा शिंत्रे या ‘प्रभाग ३ अ’ मधून स्वतंत्र लढत आहेत.
सहा प्रभागांत एकास एक लढत
प्रभाग ५, ७, ८, ९, १० व ११ याठिकाणी एकास एक सरळ लढत होत आहे. प्रभाग १ ‘अ’ मध्ये तिरंगी, प्रभाग २ ‘अ’मध्ये चौरंगी, प्रभाग ३ ‘अ व ब’, प्रभाग ४ ‘अ’ व प्रभाग ६ ‘अ’ मध्ये तिरंगी सामना होत आहे.