Kolhapur Crime: इनव्हिजन ट्रेडेक्सचा फसवणुकीचा फंडा, दामदुप्पटचे आमिष देत गुंतवणूकदारांना घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:06 IST2025-12-01T12:05:05+5:302025-12-01T12:06:28+5:30
अटकेतील जितेंद्र मगदूमला पाच दिवसांची पोलिस कोठडी

Kolhapur Crime: इनव्हिजन ट्रेडेक्सचा फसवणुकीचा फंडा, दामदुप्पटचे आमिष देत गुंतवणूकदारांना घातला गंडा
कोल्हापूर : गुंतवणुकीवर दरमहा पाच टक्के परतावा देऊन त्याशिवाय एक वर्षात मुद्दल दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवत इनव्हिजन ट्रेडेक्स प्रा. लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. सुरुवातीचे काही महिने ठरल्याप्रमाणे परतावे दिले. त्यानंतर मात्र लोकांनी तक्रारी केल्याचा बहाणा करून कंपनीच्या संचालकांनी गाळा गुंडाळला. जितेंद्र आनंदा मगदूम (वय ४०, रा. दिंडनेर्ली, ता. करवीर) याच्या अटकेमुळे पुन्हा तपासाला गती येण्याची शक्यता आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
इनव्हिजन ट्रेडेक्स प्रा. लिमिटेड या कंपनीचा प्रमुख चेतन भोसले याने गुंतवणूकदारांना मोठी आमिषे दाखवली होती. खानविलकर पेट्रोल पंपाजवळ एका इमारतीत थाटलेल्या कार्यालयातून तो कंपनीचे कामकाज चालवत होता. सेमिनार आयोजित करून तो विविध योजनांची माहिती गुंतवणूकदारांना देत होता. दरमहा पाच टक्के परताव्यासह एका वर्षात मुद्दल दुप्पट करून देण्याचे अविश्वसनीय आमिष त्याने दाखवले होते. यालाच भुलून अनेकांनी मोठ्या रकमा गुंतवल्या. सुरुवातीला काही जणांना परतावे मिळाले. नंतर मात्र सर्वांचेच लाखो रुपये अडकले.
जून २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी यातील आठ संशयितांना अटक केली होती. गेल्या सहा महिन्यांपासून पसार असलेला जितेंद्र मगदूम हा पोलिसांच्या हाती लागल्याने पुन्हा तपास गतिमान होण्याची शक्यता बळावली आहे. या टोळीवर गगनबावडा पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याची माहिती गुंतवणूकदारांनी दिली.
सापळा रचून पकडले
सहा महिन्यांपूर्वी पसार झालेला मगदूम घरी आल्याची माहिती दिंडनेर्ली परिसरातील काही गुंतवणूकदारांना मिळाली होती. गुंतवणूकदारांनी तातडीने ही माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. शनिवारी सकाळपासून काही गुंतवणूकदार त्याच्या घराबाहेर थांबून हालचालींवर लक्ष ठेवत होते. सायंकाळी पोलिस घराकडे येत असल्याची चाहूल लागताच जितेंद्र मगदूम हा घराच्या मागील दाराने शेतात पळून निघाला होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले.