Local Body Election: कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार अजितदादांचे, सर्वांत कमी शरदकाकांचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 19:03 IST2025-11-27T19:02:26+5:302025-11-27T19:03:34+5:30
काँग्रेस, भाजपचीही स्वबळ दाखवताना दमछाक

Local Body Election: कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार अजितदादांचे, सर्वांत कमी शरदकाकांचे
कोल्हापूर : जिल्ह्यातील तेरा नगरपालिका व नगरपंचायतींसाठी बुधवारी चिन्हांचे वाटप केले असून, सर्वाधिक पाच नगराध्यक्षपदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे तर सर्वाधिक ८१ नगरसेवकपदाचे उमेदवार भाजपचे आहेत.
नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस, भाजप, उद्धवसेना, जनसुराज्य पक्षाचे प्रत्येकी चार तर शिंदेसेनेच्या चिन्हावर दोन ठिकाणी उमेदवार उभे आहेत. त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी २३ अपक्ष तर तब्बल ४४३ जण नगरसेवकपदासाठी नशीब अजमावत आहेत.
राज्यात सर्वच ठिकाणी नगरपालिका, नगरपंचायतींसाठी राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला महत्त्व असून, त्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार पक्षाच्या चिन्हावर निवडून आणण्याचा प्रयत्न आहे; पण स्थानिक कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी आघाड्या कराव्या लागल्या. त्यामुळेच सर्वाधिक नगरसेवकपदाचे उमेदवार हे आघाड्या व अपक्षांचे आहेत.
काँग्रेस, भाजपचीही स्वबळ दाखवताना दमछाक
काँग्रेस व भाजप या राष्ट्रीय पक्षांना तेरा नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार देता आलेले नाहीत. त्या तुलनेत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे एकमेव आमदार जिल्ह्यात असतानाही त्यांनी सर्वाधिक ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे केले आहेत.
उमेदवारीत शिंदेसेनेपेक्षा उद्धवसेना पुढे
जिल्ह्यात एकही आमदार, खासदार नसताना उद्धवसेनेने नगराध्यक्षपदाचे ४ तर नगरसेवकपदासाठी ५६ उमेदवार उभे केले आहेत. त्या तुलनेत शिंदेसेनेचे दोन ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.
नगरपालिका निवडणुकीत ‘तुतारी’ वाजणार का?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्ह्यात अस्तित्वासाठी धडपड असल्याचे चित्र आहे. तेरा नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये एकाही ठिकाणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा करता आलेला नाही. हातकणंगले, शिरोळ व कुरुंदवाडमध्ये प्रत्येकी एका तर आजरा येथे तीन असे सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ‘तुतारी’ वाजणार का? हे पाहावे लागणार आहे.
नगराध्यक्ष व नगरसेवकपदाचे पक्षीय उमेदवार असे
पक्ष - नगराध्यक्ष (ठिकाणे) - नगराध्यक्ष - नगरसेवक
- राष्ट्रवादी (अजित पवार) - हुपरी, हातकणंगले, मिरगूड, गडहिंग्लज, कागल - ५ - ७८
- भाजप - हुपरी, हातकणंगले, कुरुंदवाड, चंदगड - ४ - ८१
- शिंदेसेना - हातकणंगले, मुरगूड - २ - ६२
- उद्धवसेना - हुपरी, हातकणंगले, कागल, मलकापूर - ४ - ५६
- काँग्रेस - हातकणंगले, कुरुंदवाड, कागल, आजरा - ४ - ५३
- जनसुराज्य - पेठवडगाव, पन्हाळा, गडहिंग्लज, मलकापूर - ४ - ४५
- राष्ट्रवादी (शरद पवार) - - - ० - ६
- जनता दल - - - ० - ८