..तर आयोगाला का जमत नाही, मतदार यादीतील घोळावरुन काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 19:39 IST2025-10-18T19:35:03+5:302025-10-18T19:39:48+5:30
दोन समाजात भांडणे लावायचे काम

..तर आयोगाला का जमत नाही, मतदार यादीतील घोळावरुन काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा सवाल
कोल्हापूर : मतदार यादीबाबत केंद्रीय निवडणूक आयोग एक सांगतेय, राज्य आयोग दुसरेच, सगळा गोंधळ सुरु आहे. निवडणूक आयोगाने ठरवल्यास राज्यातील किमान एक कोटी पेक्षा अधिक नावे ही २४ तासांत मतदार यादीतून बाजूला जातील. आयोगाच्याच माहितीवरून, सॉफ्टवेअरवरून राजकीय पक्ष जर मतदारसंघातील दुबार नावे शोधून काढू शकतात तर हे आयोगाला का जमत नाही असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
ते म्हणाले, दुबार नावे कमी केल्याने मतदान केंद्रांवरील ताण कमी होणार आहे. एखादा पडलेला आणि निवडून आलेला उमेदवार हा तुम्ही दिलेल्या डाटावरूनच संपूर्ण माहिती काढत असतो आम्ही जर काढत असू तर तुम्हाला का जमत नाही हा आमचा प्रश्न आहे.
दोन समाजात भांडणे लावायचे काम
मराठा आरक्षणावरून छगन भूजबळ, राधाकृष्ण विखे पाटील यांचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आमदार पाटील म्हणाले, भाजप आणि महायुती सरकारमध्ये एकाने एक बाजू घ्यायची आणि दुसऱ्याने एक बाजू घ्यायची अशी भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी या दोघांनाही कामाला लावले आहे. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावायची आणि निवडणूका जिंकायच्या हा त्यांचा कावा आहे.
खड्डे भरलेले बघायला मुख्यमंत्र्यांनी माणूस पाठवावा...
कोल्हापूरातील खड्ड्यांवर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल झाली आहे यावर आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर मधून राज्याला टॅक्स जास्त जातो. महाराष्ट्राच्या तिजोरीत कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा आहे. कोल्हापूरमध्ये शंभर कोटींचे रस्ते झाले ते सुद्धा व्यवस्थित नाहीत. खड्डे भरण्यासाठी शासनाने तात्काळ ५० कोटींचा निधी द्यावा. मुख्यमंत्र्यांनी खड्डे भरलेत की नाहीत हे तपासायला माणूस पाठवावा इथे काय होतय ते अखंड कोल्हापूरला माहिती आहे अशी टीका आमदार पाटील यांनी केली.