कष्टातून उभारलेले घर आगीत खाक

By Admin | Updated: August 2, 2015 01:24 IST2015-08-02T01:24:10+5:302015-08-02T01:24:10+5:30

सिद्धार्थनगरमधील हृदयद्रावक घटना : कांबळे कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा

The house of hard work | कष्टातून उभारलेले घर आगीत खाक

कष्टातून उभारलेले घर आगीत खाक

कोल्हापूर : सिद्धार्थनगर येथे वास्तव्यास असणाऱ्या कांबळे कुटुंबीयांनी अठरा विश्व दारिद्र्यात जगत असताना काबाडकष्ट करून दोन मजली घर बांधले. सुखी जीवनाचा संसार सुरू असताना शनिवारी दुपारी अचानक घराला शॉर्टसर्किटने आग लागली आणि त्यामध्ये सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. यावेळी कुटुंबाचा होणारा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली.
सिद्धार्थनगर येथील सत्याई गल्लीमध्ये अविनाश शंकर कांबळे यांचे दोन मजली घर आहे. ते व त्यांची पत्नी दोघेही खासगी नोकरी करतात. आई-वडील व मुलगा असे त्यांचे कुटुंब याठिकाणी वास्तव्यास आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने कांबळे दाम्पत्याने कष्टातून दोन मजली घर बांधले होते. शनिवारी सकाळी ते व पत्नी कामावर गेले. आई व मुलगा बाहेर गेले होते. वडील वरच्या मजल्यावर झोपले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक त्यांच्या घरातून मोठा आवाज होऊन धुराचे लोट बाहेर आले. हा आवाज ऐकून शेजारील लोकांनी आरडाओरड केली. यावेळी अजय कांबळे या मुलाने वरच्या मजल्यावर झोपलेल्या आजोबांना खाली आणले. त्यानंतर काही क्षणातच आगीने उग्र रूप धारण केले. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी आतमधले काहीच दिसत नव्हते. या घटनेची माहिती अग्निशामक दलास देण्यात आली. महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान तीन बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. सर्व प्रथम ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांना बोलावून विद्युतप्रवाह बंद करण्यात आला. त्यानंतर पाण्याच्या फवाऱ्याने आग विझविण्यात आली. आगीमध्ये सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले होते. कांबळे यांच्या घरामध्ये फ्रिज होता. तो सुरूच असल्याने शॉर्टसर्किट होऊन त्याचा स्फोट झाला. त्यानंतर आगीने पेट घेतल्याची शक्यता अग्निशामक दलाच्या जवानांनी वर्तविली.नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जळालेले प्रापंचिक साहित्य बाहेर काढण्यात आले होते.
मोठा अनर्थ टळला
स्वयंपाक घरामध्ये पूर्ण भरलेली गॅस सिलिंडर टाकी होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी सर्वप्रथम स्वयंपाक घरामध्ये प्रवेश करून सिलिंडरची टाकी बाहेर काढली. यासाठी थोडा जरी उशीर झाला असता, तर टाकीचा स्फोट होऊन मोठा अनर्थ घडला असता. तसे अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी सांगितले. या आगीमध्ये शेजारी राहणाऱ्या कमल मुकुंद कोल्हे यांच्याही घराला झळ पोहोचून त्यामध्ये त्यांचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले.

Web Title: The house of hard work