नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात भीषण अपघात, भरधाव कारने चौघांना चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:37 IST2026-01-01T14:36:18+5:302026-01-01T14:37:02+5:30
कारचालक ताब्यात

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात भीषण अपघात, भरधाव कारने चौघांना चिरडले
कोल्हापूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात तावडे हॉटेल येथे भीषण अपघात झाला. भरधाव कारने शेकोटीला थांबलेल्या चौघांना चिरडले. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. कारचालक मुकेश अरुण अहिरे (वय २९, सध्या रा. कारंडे मळा, कोल्हापूर, मूळ रा. मुंबई) याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.
दिलीप आण्णाप्पा पवार (६५, रा. वळीवडे रोड, गांधीनगर, जि. कोल्हापूर), सुधीर कमलाकर कांबळे (४१, रा. घरनिकी, ता. आटपाडी, जि. सांगली) आणि विनयसिंह गौंड (२७, रा. मौरदहा, मध्यप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. जखमी नवला नारायण शेळके (४५, रा. धनगर गल्ली, कागल) यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक मुकेश अहिरे याचा इव्हेंमट मॅनेजमेंट कंपनी असून, तो सध्या कारंडे मळा येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो. कराड येथील एका हॉटेलमध्ये कामासाठी त्याने कर्मचा-यांना पाठवले होते. त्यांना आणायला कार घेऊन बाहेर पडला. तावडे हॉटेल येथील बस स्टॉपजवळ समोरून आलेल्या वाहनाचा लाईट डोळ्यावर पडल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. घाईत ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबल्याने त्याने रस्त्याकडेला शेकोटीजवळ थांबलेल्या चौघांना उडवले.
तिघांना काही अंतर फरफटत नेऊन त्याची कार थांबली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. काही रिक्षाचालकांनी रुग्णवाहिका बोलवून शाहूपुरी पोलिसांना अपघाताची माहिती कळवली. पोलिस उपनिरीक्षक अंकुश कारंडे यांनी पथकासह तातडीने अपघातस्थळी पोहोचून मृतांना सीपीआरमध्ये दाखल केले. कारचालक अहिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला.