कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस; पंचगंगा इशाऱ्या पातळीकडे, ५८ बंधारे पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:35 IST2025-07-28T13:32:50+5:302025-07-28T13:35:09+5:30
गगनबावड्यात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी, एस. टी. चे चार मार्ग ठप्प

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस; पंचगंगा इशाऱ्या पातळीकडे, ५८ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर उघडझाप असली तरी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. ‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘वारणा’ धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे. दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी अडीच फुटांनी वाढली असून इशारा पातळीकडे आगेकूच सुरू केली आहे. जिल्ह्यात ५८ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे. गगनबावडा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे.
शनिवारी दिवसभर व रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळला. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १९.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरी गगनबावडा तालुक्यात तब्बल ११९.८ मिलीमीटर पाऊस झाला. आजरा, भुदरगड, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा तालुक्यात तुलनेत अधिक पाऊस झाला.
रविवारी दिवसभर कोल्हापूर शहरासह शेजारील तालुक्यात उघडझाप असली तरी धरण क्षेत्रात पाऊस आहे. राधानगरी धरणाचे ४,५,६ हे तीन स्वयंचलित दरवाजे खुले असून प्रतिसेकंद ५७८४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून १३ हजार ५३० तर दूधगंगा धरणातून १६०० घनफूट पाणी सुटले आहे. त्यामुळे नद्यांची पातळीत वाढ होत आहे.
पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होऊन ती ३५.११ फुटांवर पोहचली होती, पंचगंगेने इशारा (३९ फूट) पातळीकडे आगेकुच सुरू केल्याने कोल्हापूरकरांची पुन्हा धाकधूक वाढली आहे. पंचगंगा नदी चौथ्यांदा पात्राबाहेर पडली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात २० खासगी मालमत्तांची पडझड होऊन ६ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहीती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
आठ मार्ग बंद..
जिल्ह्यातील दोन राज्य तर सहा प्रमुख जिल्हा मार्ग असे आठ मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरु आहे.
एस. टी. चे चार मार्ग पूर्णपणे ठप्प
एस.टी.चे चंदगड ते भोगोली, चंदगड ते पिळणी व चंदगड ते बोवाची वाडी त्याचबरोबर गडहिंग्लज ते काेवाडे व राधानगरी ते पडळ हे मार्ग पूर्णपणे बंद आहेत.