कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस; ‘वारणा’, ‘राधानगरी’चा विसर्ग वाढला, नद्यांच्या पातळीत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:16 IST2025-09-03T12:15:04+5:302025-09-03T12:16:36+5:30

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Heavy rain in Kolhapur district River levels rise due to increased water release from Varana, Radhanagari Dam | कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस; ‘वारणा’, ‘राधानगरी’चा विसर्ग वाढला, नद्यांच्या पातळीत वाढ 

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस; ‘वारणा’, ‘राधानगरी’चा विसर्ग वाढला, नद्यांच्या पातळीत वाढ 

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात अतिवृष्टी झाली. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. वारणा धरणातून विसर्ग वाढला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंचगंगा नदीची पातळी २५.०७ फुटावर असून २१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सकाळ पासून जिल्ह्यात पाऊस अधिक राहिला. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात धुवाधार पाऊस कोसळल्याने सगळीकडे पाणीचपाणी राहिले. राधानगरी धरणाचे ३ व ६ क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून त्यातून प्रतिसेकंद ४३५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवणे करिता धरणातून मंगळवारी दुपारी बारा वाजता वक्रद्वाराद्वारे ३३६५ तर वीज निर्मितीसाठी १६३० असे ४९९५ घनफूट विसर्ग सुरू आहे. पाऊस असाच राहिला तर विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे धरण व्यवस्थापनाने सांगितले.

दरम्यान, मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ८ मिली मीटर पाऊस झाला. या कालावधीत १३ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ३ लाख ७७ हजारांचे नुकसान झाले आहे.

विसर्जनावेळी उघडीप..

मंगळवारी घरगुती गणपतीचे विसर्जन होते, सकाळ पासूनच जोरदार पाऊस कोसळत राहिल्याने गणपती बाप्पांचे विसर्जन कसे करायचे? असा प्रश्न होता. मात्र, दुपारनंतर विसर्जनाच्या वेळी पावसाचा जोर कमी झाला होता.

ग्रामीण भागात गणेशोत्सव मंडळाची तारांबळ

जिल्ह्यात विशेषता ग्रामीण भागात गणपती विसर्जनाच्या अगोदरच्या दिवशी सोमवारी सजीव देखावे खुले झाले होते. मात्र, रात्रभर पाऊस राहिला त्याचबरोबर मंगळवारी विसर्जना दिवशीही पाऊस राहिल्याने मिरवणुका काढण्यावर मर्यादा आल्या होत्या. यामुळे तरुणांच्या उत्साहावर काहीसे पाणी फिरले होते.

Web Title: Heavy rain in Kolhapur district River levels rise due to increased water release from Varana, Radhanagari Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.