शाहूवाडी येथे विवाहितेचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST2021-09-22T04:28:46+5:302021-09-22T04:28:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : शाहूवाडी येथील विवाहितेचा सासरच्या लोकांनी गळा आवळून खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची ...

He murdered a married woman at Shahuwadi and dumped her body in a well | शाहूवाडी येथे विवाहितेचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला

शाहूवाडी येथे विवाहितेचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : शाहूवाडी येथील विवाहितेचा सासरच्या लोकांनी गळा आवळून खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. शुभांगी राजेंद्र जाधव (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव असून याप्रकरणी पती राजेंद्र अमृत जाधव, सासरा अमृत आनंदराव जाधव, सासू सावित्री अमृत जाधव, चुलत दीर सोमनाथ परशुराम जाधव यांच्याविरोधात शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांतून मिळालेली महिती अशी, शाहूवाडीतील राजेंद्र जाधव याचा २०१४ मध्ये शुभांगी हिच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर दोन वर्षे शुभांगीला सासरच्या मंडळींकडून कोणताही त्रास होत नव्हता. मात्र तेथून पुढे पती राजेंद्र, सासरा अमृत, सासू सवित्री, चुलत दीर सोमनाथ यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून ती हुपरी येथे आपल्या आई-वडिलांकडे जात होती. गुरुवार दि. १६ सप्टेंबर रोजी ती घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद पती राजेंद्र जाधव याने दिली होती.

दरम्यान, मंगळवार दि. २१ रोजी सकाळी करंजोशी येथील जॅकवेलवर शाहूवाडी ग्रामपंचायतीचा शिपाई पाणी सोडण्यासाठी गेला असता, विहिरीत शुभांगीचा मृतदेह तरंगत असल्याचा दिसला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला.

मृत शुभांगी हिचा भाऊ प्रेम गोसावी याने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. माझ्या बहिणीने आत्महत्या केली नसून तिचा गळा आवळून खून करून तिला विहिरीत टाकले आहे. जोपर्यंत सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. शाहूवाडी पोलिसांनी पती, सासू, सासरा, चुलत दिरावर गुन्हा दाखल केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. शुभांगी हिला तीन मुले आहेत.

शुभांगी जाधव हिचे सासरचे घर शाहूवाडी पोलीस ठाण्यापासून पन्नास मीटर अंतरावर आहे. एवढी मोठी घटना घडून देखील पोलिसांना याची कल्पना कशी आली नाही, याची चर्चा घटनास्थळी होती. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील करीत आहेत.

फोटो २१ शुभांगी राजेंद्र जाधव - मयत

आत्महत्येचा बनाव

सासरच्या मंडळींनी शुभांगी हिचा गळा आवळून खून करून मृतदेह विहिरीत टाकला होता. पती राजेंद्र जाधव याने, माझी पत्नी बेपत्ता झाली आहे, अशी फिर्याद शाहूवाडी पोलिसात देऊन, पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव केला होता.

Web Title: He murdered a married woman at Shahuwadi and dumped her body in a well