Gurupurnima special: कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींचे गुरु कोण?, काय आहेत त्यांच्याबद्दल भावना.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 18:56 IST2025-07-10T18:55:04+5:302025-07-10T18:56:28+5:30
गुरुस्थानी असलेल्या सर्वांविषयीच्या या नेतेमंडळींच्या कृतज्ञतेच्या भावना त्यांच्याच शब्दात..

Gurupurnima special: कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींचे गुरु कोण?, काय आहेत त्यांच्याबद्दल भावना.. वाचा
सहकार, शिक्षणापासून राजकारणापर्यंत अनेक क्षेत्रात अव्वल असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नेतेमंडळींनी गुरुर्पोर्णिमेचे औचित्य साधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यातील अनेकांना आईवडिलांकडूनच जीवन प्रकाशमय करण्याची प्रेरणा मिळाली. संस्थात्मक वारसा नेटाने पुढे नेताना ही सर्व मंडळी प्रेरणास्थानांना विसरत नाहीत. गुरुस्थानी असलेल्या सर्वांविषयीच्या या नेतेमंडळींच्या कृतज्ञतेच्या भावना त्यांच्याच शब्दात...
(टीम लोकमत कोल्हापूर)
आई स्वर्गीय सुशिलादेवी आणि वडील आनंदराव आबिटकर हे माझ्या आयुष्यातील पहिले गुरू. वडील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते. गारगोटीचे ते सरपंच होते. त्यामुळे लहानपणापासून वंचित, अन्याय झालेली, पिचलेली अनेक लोक घरी यायचे आणि त्यांच्यासाठी झगडणारे वडील हे चित्र पहात मी मोठा झालो. पहिले ‘रोल मॉडेल’ वडीलच. दुसरे खंदे ‘रोल मॉडेल’ दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे. त्यांच्याकडून कोणतेही पद सामान्यांसाठी कसे राबवायचे याचा वस्तुपाठ शिकलो. - प्रकाश आबिटकर , पालकमंत्री, कोल्हापूर
वडील मियाँलाल मुश्रीफ यांच्याकडून समाजातील शेवटच्या घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही करावे लागेल ते कर, ही शिकवण वडिलांकडून मिळाली. ते माझ्या आयुष्यातील मोठे गुरू होते. चौगुले गुरुजींमुळे वक्तशीरपणा माझ्या अंगी आला. सप्रे सरांमुळे आत्मविश्वास आला. स्वर्गीय शामराव भिवाजी पाटील, विक्रमसिंह घाटगे आणि सदाशिवराव मंडलिक हे माझे गुरू राहिले. ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता गुरूस्थानी आहेत. - हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार हेच माझे गुरू व मार्गदर्शक आहेत. मी त्यांचा कार्यकाळ अनुभवलेला नाही, परंतु वाचनातून त्यांचे विचार आत्मसात केले. दुसरे गुरू माझे वडील छत्रपती शहाजी महाराज आहेत. त्यांचे समाजकार्य, राज्य कारभार, शैक्षणिक कार्य, आर्थिक बाबीवरील नियंत्रण, बजेटिंग सीस्टिम हे त्याचे गुण माझ्या आयुष्याचे मार्गदर्शक ठरले. शिक्षक, प्राध्यापक, मित्र भेटले, त्यांच्याकडूनही काही ना काही स्फूर्ती मिळाली आहे. - शाहू छत्रपती, खासदार
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात राजकीय चढउतार असतात, त्याप्रमाणे माझ्याही कारकीर्दीत उताराचे दिवस आले होते. अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला साथ देत अपयशातून बाहेर काढून पुन्हा यशाच्या राजमार्गावर नेले. राजकारणामध्ये मतभेद असावेत, पण मनभेद नसावा हा परिपाठ त्यांनी दिला. विचारांवर आणि तत्त्वांवर नेहमी ठाम राहा हे त्यांनी शिकविले. मुख्यमंत्री फडणवीस हे माझ्यासाठी फ्रेंड - फिलॉसॉफर आणि गाईड आहेत. - खासदार धनंजय महाडिक
माझ्या जडणघडणीत वडील डॉ.डी.वाय. पाटील यांचे सर्वात मोठे योगदान आहे. वडिलांनी शिस्त, प्रामाणिकपणा, संस्कार आमच्यात खऱ्या अर्थाने पेरले. दुसऱ्यांसाठी नेहमी धावून जाणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांची हीच शिकवण जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला प्रेरणा देते. आपण दुसऱ्यांना जी मदत करतो ती वाळूत लिहा..पण आपणाला जे मदत करतात ते मात्र हृदयात कोरा ही त्यांची शिकवण कधीच विसरलो नाही. माझ्या राजकीय, सामाजिक जीवनात वडिलांचे विचार घेऊनच वाटचाल सुरू आहे. - आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे गटनेते, विधानपरिषद.
मातोश्री शोभाताई यांनीच माझ्यावर मुलभूत संस्कार केले. त्यामुळे माझ्या आयुष्यातील पहिल्या गुरू त्याच आहेत. तात्यासाहेब कोरे यांच्या कुटुंबात माझा जन्म होणे हेच माझे भाग्य. त्यांनी वारणा विविध उद्योग समुहातमध्ये जी कार्यसंस्कृती निर्माण केली ती संस्कृतीच गुरूपण निभावते. ज्याच्याकडून काही चांगलं शिकता येईल, घेता येईल त्याच्याकडून ते घ्यावं आणि त्यातून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये मुलभूत विधायक बदल घडवताना क्षणोक्षणी मार्गदर्शक भेटतात ज्यांच्यामध्ये गुरूपणाचा अंश असतो. - विनय कोरे, आमदार
अध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री नृसिंहवाडीतील दत्त महाराज यांची कृपा आणि पिताजी कै. शामराव पाटील यड्रावकर (अण्णा) यांचा आशिर्वाद हा नेहमी माझ्या वाटचालीचा आधार ठरला. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सहकारवैभव निर्माण केले आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात प्रगतीचे दिवस आणले त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माझी वाटचाल सुरू आहे. - राजेंद्र पाटील यड्रावकर , आमदार
जीवनात सर्वश्रेष्ठ गुरू माझे आई-वडील आहेत. त्यांची शिकवण आजअखेर मला खूप मोलाची ठरली. मला समाजकारणात, राजकारणात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरू भेटले. आज मी जे काही चांगले काम करत आहे ते त्यांच्याच प्रेरणेतून सुरू आहे. माझे आध्यात्मिक गुरू म्हणाल तर तोडकर महाराज, सांगवडेकर महाराज, काडसिद्धेश्वर स्वामी, मुंगळे गुरुजी यांचेही मौलिक मार्गदर्शन झाले. - आमदार राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सुरुवातीच्या काळात देशभक्त आमदार डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी मोठे पाठबळ दिले. ते माझे गुरू आहेत. त्यांनी आधार देत मार्गदर्शन केले. युवा कार्यकर्ता म्हणून त्यांनी मला वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी दिली. राजकीय, सामाजिक जीवनात विधायक कार्य करण्याची दिशा दाखविली. त्याच वाटेवरून मी आजही चालत आहे. - अशोकराव माने, आमदार, हातकणंगले मतदारसंघ
माझे राजकीय गुरु माझे वडील कल्लाप्पाण्णा आवाडे हे आहेत. त्यांच्या मार्गदर्शखाली १९७० साली दत्ताजीराव कदम यांच्या निवडणुकीपासून मी सार्वजनिक जीवनात कामास सुरुवात केली. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली माझी राजकीय वाटचाल सुरू झाली. वस्त्रोद्योग मंत्री झाल्यानंतर राज्यातील वस्त्रोद्योगाला उभारी देत २३ कलमी पॅकेज आणि विविध योजना राज्यासाठी लागू केल्या. वडिलांनी घालून दिलेल्या पायावर मी शिखर उभारण्याचे काम केले. -प्रकाश आवाडे, माजी आमदार, इचलकरंजी
सातवी पास असणारे वडील परशराम पाटील हेच माझे खरे गुरू. त्यांनी मला समाजकारणाचे बाळकडू दिले. आज जी शाळा उभी केली ही वडिलांची संकल्पना होती. एखाद्या संकटात कसे ताकदीने पाय रोवून उभे राहायचे, हे त्यांनी शिकविले. त्यामुळे आयुष्यात अनेक चढउतार आले तरी न डगमगता दुसऱ्या दिवसापासून लोकांच्या प्रश्नांसाठी उभे राहण्याचे बळ मिळाले. - के.पी.पाटील, अध्यक्ष, दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री