देवही बनले शाकाहारी

By Admin | Updated: December 16, 2014 23:49 IST2014-12-16T23:17:09+5:302014-12-16T23:49:32+5:30

मांसाहारी यात्रांना सुटी : अनिष्ट प्रथा, परंपरांना मूठमाती

Goddess became a vegetarian | देवही बनले शाकाहारी

देवही बनले शाकाहारी

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर -परिवर्तनाचा ध्यास घेतलेली उचगाव (ता. करवीर) येथील पारधी समाजाची वसाहत. एकेकाळी अनिष्ट प्रथा आणि परंपरांच्या जोखडात अडकलेला हा समाज. मात्र, या वसाहतीतील समाज बांधवांनी लग्न आणि मृत्यूनंतरच्या जाचक रूढी, प्रथा आणि परंपरांना मूठमाती दिली आहे. एवढेच नव्हे, तर वर्षातून चारवेळा देवांच्या यात्रा व्हायच्या. त्याची संख्या आता एका यात्रेवर आणली आहे. यात्रेत देवाला दिला जाणारा मांसाहारी नैवेद्य बंद करून शाकाहारी यात्रा करण्याचा निर्णय घेऊन तो अमलात आणणारी ही पारधी समाजातीलच नव्हे, तर सर्व समाजातील एकमेव वसाहत असावी.
या वसाहतीमध्ये वर्षाला
कमीत-कमी चार देवांची यात्रा केली जात होती. यात्रेत कोंबडी, बकऱ्यांचा बळी दिला जात होता. प्रत्येक कुटुंबावर यात्रेचा आर्थिक भार पडत होता. मिळविलेले सर्व यात्रेत गमावण्याची वेळ आली. त्यामुळे वसाहतीमध्ये वर्षातून एकदाच शाकाहारी यात्रा करण्याचा निर्णय उचगावचे माजी सरपंच, या समाजाचे मार्गदर्शक गणेश काळे याच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून येथे दुर्गामाताची यात्रा शाहाकारी होत आहे. एकत्रितपणे महाप्रसादाचे वाटप केले जाते. परिणामी खर्चातही बचत होत आहे. अनिष्ट प्रथा-परंपरांना मूठमाती देतानाच समाजाला व्यसनाधिनतेच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. नशाबंदी, गुटखाबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

वर्गणी गोळा न करता गणेशोत्सव
कोणाकडूनही वर्गणी गोळा न करता प्रत्येकवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. वायफळ खर्च आणि डॉल्बीला फाटा देऊन हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.


मुधोळ संस्थानातून आलेल्या समाजाला सुरुवातीला अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी संघर्ष करावा लागला. चुकीच्या प्रथा, परंपरा बाजूला सारून समाजाला व्यसनाधिनतेच्या विळख्यातून बाजूला काढले. समाजातील काही लोकांमुळे पडलेला गुन्हेगारीचा डाग पुसून लोकसहभागातून एक आदर्श वसाहत निर्माण करण्याचे स्वप्न आहे. समाजातील प्रत्येक कुटुंंब सुखी व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- गणेश काळे, मार्गदर्शक व
माजी सरपंच, उचगाव

Web Title: Goddess became a vegetarian