यशवंत प्रोसेसर्सची वार्षिक सर्वसाधारण सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत असलेल्या येथील यशवंत प्रोेसेसर्सला पुन्हा गतवैभव प्राप्त होत आहे. लवकरच ही संस्था अडीअडचणीतून मुक्त होईल, असा विश्वास अध्यक्ष अहमद मुजावर यांनी व्यक्त केला.
दि यशवंत को-ऑप. प्रोसेसर्सची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यस्थळी पार पडली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला श्रद्धांजलीचा ठराव उपाध्यक्ष श्रेणिक मगदूम यांनी मांडला. व्यवस्थापक शफीक मणेर यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दर्शवली.
स्वप्निल आवाडे यांनी, संस्थेसमोर अनेक अडचणी आणि समस्या निर्माण झाल्या होत्या; पण गत दोन वर्षात संस्थेचे अस्तित्व अबाधित राखले आहे. यावेळी प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, सर्जेराव पाटील, सुधाकर मणेरे, विलास गाताडे, नरसिंह पारीक, चंद्रकांत इंगवले, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अरुण निंबाळकर यांनी केले. राजाराम बोंगार्डे यांनी आभार मानले.