कोल्हापूर जिल्ह्यात अखेर वळवाची हजेरी, उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 06:03 PM2024-04-19T18:03:42+5:302024-04-19T18:03:55+5:30

शिरोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान

finally receives heavy rains in Kolhapur district, some relief for heat-shocked citizens | कोल्हापूर जिल्ह्यात अखेर वळवाची हजेरी, उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा

कोल्हापूर जिल्ह्यात अखेर वळवाची हजेरी, उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून उष्म्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना रात्री झालेल्या वळीव पावसाने थोडासा दिलासा दिला. हा दिलासा फार काळ टिकला नाही. केवळ वीस मिनिटे बरसलेल्या या पावसाने रात्रीची झोप मात्र नकोशी करून सोडली. पाऊस पडून गेल्यानंतर रात्री पुन्हा उकाड्याने शहरवासीय हैराण झाले.

नवीन वर्षातील पहिल्या वळीव पावसाची शहरवासीय गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. दिवसभर कडाक्याचे ऊन, त्यामुळे होणाऱ्या अंगाची काहिलीने नागरिक भलतेच अस्वस्थ होते. दुपारच्या वेळी उन्हातून फिरणेदेखील मुश्कील होऊन गेले होते.

गुरुवारी दिवसभर फारच गदगदत होते. अंगातून घामाच्या धारा लागलेल्या होत्या. सायंकाळी वळीव पाऊस पडेल असे वातावरण तयार झाले होते. रात्री थोडे वारे सुटले. त्यानंतर साडेदहा वाजण्याच्या सुमारास आकाश भरून आले. जोरदार वारे, विजांचा लखलखाट होऊ लागल्याने जोराचा पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. केवळ वीस मिनिटेच पाऊस झाला. या वर्षातील पहिलाच पाऊस असल्याने मातीचा सुगंध सुटला. पण, वीस मिनिटानंतर मात्र पाऊस थांबला. शहरवासीयांची जोरदार पावसाची अपेक्षा भंग पावली.

कसबा वाळवे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

कसबा वाळवे : विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह आज रात्री १०:३० वाजेच्या सुमारास येथील परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरू होती. हवेत गारवा पसरल्याने उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

राधानगरीत वादळी वाऱ्यासह मुसळदार पाऊस

राधानगरी :  राधानगरीत गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. राधानगरीसह धरण परिसरात तासभर पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. ऊस पिकांना पाणी मिळाल्याने शेतकरी सुखावला. मुसळधार पावसामुळे राधानगरीसह परिसरातील वीजपुरवठा रात्री खंडित करण्यात आला होता.

शिरोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान

गणेशवाडी : शिरोळ तालुक्यात बुधवारी दुपारी चार वाजता वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे भाजीपाला, केळी, उसाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. या पावसामुळे राजापूर, खिद्रापूर परिसरात भाजीपाला, उसाचे नुकसान झाले आहे. वांगी, टॉमटो या भाजीपाल्याची रोपे वादळी वाऱ्यामुळे उपटून पडली आहेत. केळीचे झाडेही तुटल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. 
 

Web Title: finally receives heavy rains in Kolhapur district, some relief for heat-shocked citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.