Ratnagiri-Nagpur Highway: चौपट भरपाईसाठी शेतकऱ्यांचा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:48 IST2025-10-28T15:47:34+5:302025-10-28T15:48:20+5:30
मोजणी रद्दचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे

Ratnagiri-Nagpur Highway: चौपट भरपाईसाठी शेतकऱ्यांचा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठिय्या
हातकणंगले : रत्नागिरी–नागपूर मार्गावर मोजणी करण्यासाठी तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी अतिग्रे आणि मजले येथील ड्रोन मोजणीसाठी येण्याच्या अगोदरच, शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या दारावर ठिय्या आंदोलन सुरू केले.
तहसीलदार सुशील बेलेकर आणि भूमी अभिलेखचे उपअधीक्षक जयदीप शितोळे यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांनी चौपट भरपाईचा निर्णय होईपर्यंत मोजणीला परवानगी देणार नाही असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी दिला. अखेर उपजिल्हाधिकारी रूपाली चौगुले यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांची बैठक घेतली. चर्चेनंतर मोजणी रद्द केल्याचे सांगून आणि जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होईल असे आश्वासन दिल्याने शेतकरी शांत झाले.
हातकणंगले तालुक्यातील चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले या गावांतील चौपदरी महामार्गासाठी जमिनी मोजण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. यामुळेच शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी ९ वाजता हातकणंगले येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी आंदोलन थांबवण्याची विनंती केली, मात्र शेतकऱ्यांनी मोजणी थांबवली नाही तर उठणार नाही असा ठाम निर्धार केला.
त्यानंतर तहसीलदार सुशील बेलेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन उपजिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. उपजिल्हाधिकारी रूपाली चौगुले यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील म्हणाले, महसूल मंत्र्यांच्या दालनात बैठक होऊन अद्याप चौपट भरपाईविषयी निर्णय झालेला नाही. प्रशासनाने बेकायदेशीर पद्धतीने मोजणी सुरू केली आहे. चौपट भरपाईचा निर्णय होईपर्यंत मोजणीला परवानगी देणार नाही. उपजिल्हाधिकारी चौगुले यांनी आजची मोजणी रद्द केल्याचे जाहीर करून लवकरच जिल्हाधिकारी यांच्या समक्ष बैठक होईल असे आश्वासन दिले.
आंदोलनात डॉ. अभिजित इंगवले, सुरेश खोत, किरण जामदार, अमित पाटील, दीपक वाडकर, अविनाश कोडोले, सुधाकर पाटील, मिलिंद्र चौगुले, प्रतीक मुसळे, शिलवंत बिडकर, आनंदा पाटील, जयकुमार दुघे, सचिन मगदूम, अजित रणनवरे उपस्थित होते.