शेतकरी संघ, मजूर संघाचे उद्यापासून धूमशान

By Admin | Updated: August 23, 2015 17:53 IST2015-08-23T17:50:40+5:302015-08-23T17:53:45+5:30

जिल्ह्याचे लक्ष: शुक्रवारपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत

Farmers' association, labor union, Dhumashan from tomorrow | शेतकरी संघ, मजूर संघाचे उद्यापासून धूमशान

शेतकरी संघ, मजूर संघाचे उद्यापासून धूमशान

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघ व कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या निवडणुकीचे धूमशान सोमवारपासून (दि.२४) सुरू होत आहे. शेतकरी संघासाठी शुक्रवारी (दि. २८) तर मजूर संघासाठी शनिवारी (दि. २९)पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून १४ सप्टेंबरपर्यंत माघार घेता येणार आहे. शेतकरी संघासाठी २५ सप्टेंबर तर मजूर संघासाठी २३ सप्टेंबरला मतदान होणार आहे.
शेतकरी संघाचे व्यक्ती सभासदांबरोबर विकास सेवा संस्था, दूध संस्था, प्रक्रिया संस्था, कुक्कटपालन, पाणीपुरवठा संस्था सभासद आहेत. गेली तीन महिने संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींची नावे घेऊन सहकार विभागाने मतदार यादी तयार केली आहे. प्रारूप यादीवर ३१ जुलैपर्यंत हरकती घेऊन १२ आॅगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. अंतिम यादी प्रसिद्धीनंतर दहा दिवसांत प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, लागतो. त्याप्रमाणे सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. शुक्रवारपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून २९ आॅगस्टला दाखल अर्जांची छाननी होणार आहे. ३१ आॅगस्टला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असून १४ सप्टेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. अर्ज लक्ष्मीपुरी येथील करवीर सहाय्यक निबंधक कार्यालयात दाखल केले जाणार आहेत.
शेतकरी संघाच्या गत निवडणुकीत बहुतांशी जागा बिनविरोध झाल्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल यासह सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येत निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न केले होते. त्यामध्ये बऱ्यापैकी यश आले होते. यावेळीही सत्तारूढ गटाचे नेते व संघाचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव मोहिते व कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी करवीरचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे काम पाहत आहेत.
कोल्हापूर मजूर संघासाठीही सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. या संघासाठी संस्था सभासद असून मतदान मोजकेच असल्याने प्रत्येक निवडणुकीत अटीतटीचा सामना होतो. गेल्यावेळेला मुकुंद पोवार व उदय जोशी यांच्यात सरळ लढत झाली होती. मध्यंतरी पोवार यांच्या अविश्वास ठराव आणून उदय जोशी यांनी कब्जा मिळविला. मतदारयादी करताना काही संस्थांना अपात्र केल्याने निवडणुकीत टोकाचा संघर्ष पाहावयास मिळणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे ठाकरे काम पाहत आहेत.

Web Title: Farmers' association, labor union, Dhumashan from tomorrow