आसवणी प्रकल्पात पर्यावरण संतुलनाची खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:30+5:302021-02-05T06:53:30+5:30
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या आसवणी प्रकल्प उभारणीच्या कामातील एक ...

आसवणी प्रकल्पात पर्यावरण संतुलनाची खबरदारी
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या आसवणी प्रकल्प उभारणीच्या कामातील एक महत्त्वाचा भाग म्हणून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून कारखाना कार्यस्थळावर गुरुवारी पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी आयोजित केली होती. यासाठी जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रदूषण मंडळ कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, फिल्ड ऑफिसर संजय मोरे व नीलेश मारबळ आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
कारखानासभोवतालच्या हुपरी, यळगूड, रेंदाळ, जंगमवाडी, तळंदगे, रांगोळी, पट्टणकोडोली, इंगळी या गावांतील नागरिक, लोकप्रतिनिधी, महिला तसेच वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे या भागात होणाऱ्या सुधारणा तसेच प्रदूषणापासून कारखान्याने घेतलेली खबरदारी याबाबत नागरिकांनी माहिती जाणून घेतली. त्यांच्या सर्व शंकांचे कारखाना प्रशासनाकडून समाधानकारक निरसन करण्यात आले. या आसवनी प्रकल्पातील सांडपाण्याचा शंभर टक्के पुनर्वापर होणार आहे. सुमारे १२५ कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प असुन साधारणपणे ३३० दिवस हा प्रकल्प चालू राहणार आहे. यावेळी कारखाना कार्यस्थळावर पर्यावरणाच्या देखरेखीकरिता बसविलेल्या एन्व्हायरोन्मेंट मॉनेटरिंग डिस्प्ले युनिटचे उद्घाटन प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
मोलॅसिस किंवा उसाच्या रसापासून प्रतिदिन १०० केएलपीडी क्षमतेच्या आसवणी प्रकल्प उभारणीचे काम कारखाना व्यवस्थापनाने हाती घेतलेले आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कागदपत्रांची पूर्तता, जागेची निश्चितता, नाणेनिधीची उपलब्धता याबरोबरच पर्यावरण संतुलनाविषयी पूर्ण खबरदारी कारखान्याने घेतलेली आहे. पर्यावरण संतुलनासाठी शासनाच्या आवाहनानुसार कारखाना मालकीच्या एकूण जागेच्या एक तृतीयांश म्हणजे ३३ टक्के जागेवर सुमारे ६२ हजार झाडांचे रोपण करून त्यांचे उत्तमरीत्या संगोपनही केलेले आहे. जवाहर कारखान्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांचे तंतोतंत पालन केल्याबद्दल कारखाना व्यवस्थापनाचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.
-------::------
फोटो ओळी - जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या आसवणी प्रकल्पाबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून कारखाना कार्यस्थळावर गुरुवारी पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी आयोजित केली होती. यासाठी जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रदूषण मंडळ, कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, फिल्ड ऑफिसर संजय मोरे व नीलेश मारबळ आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.