कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये रणधुमाळी; नेत्यांसह मतदारांचाही लागणार कस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:03 IST2025-11-05T12:02:19+5:302025-11-05T12:03:22+5:30
Local Body Election: प्रमुख चार पक्षांचे झालेले सहा पक्ष, गेल्या आठ वर्षात बदललेली राजकीय परिस्थिती आणि इच्छुकांची वाढलेली संख्या यामुळे या सर्व ठिकाणी टोकाचा राजकीय संघर्ष पहावयास मिळणार

कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये रणधुमाळी; नेत्यांसह मतदारांचाही लागणार कस
कोल्हापूर : अपेक्षेप्रमाणे मंगळवारी जिल्ह्यातील १३ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा झाली. त्यामुळे या सर्व शहरातील राजकीय वातावरण महिनाभर तापलेले राहणार आहे. प्रमुख चार पक्षांचे झालेले सहा पक्ष, गेल्या आठ वर्षात बदललेली राजकीय परिस्थिती आणि इच्छुकांची वाढलेली संख्या यामुळे या सर्व ठिकाणी टोकाचा राजकीय संघर्ष पहावयास मिळणार आहे.
जिल्ह्यातील जुन्या नगरपालिका म्हणून पन्हाळा, मुरगुड, मलकापूर, कागल, गडहिंग्लज नगरपालिकांकडे पाहिले जाते, तर चंदगड, आजरा, हातकणंगले, शिराेळ या नगरपंचायती आणि हुपरी या नगरपालिकेची पाच वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली होती. कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका लागणार याची कल्पना असल्याने गेले सहा महिने विविध राजकीय पक्ष आणि गटांनी जोडण्यांना सुरुवात केलेली होती.
महायुतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप आणि शिंदेसेना असे सत्तारूढ तीन पक्ष असल्याने या सर्वच ठिकाणी तुल्यबळ लढती होणार असून, काही ठिकाणी महायुतीविरोधातमहाविकास आघाडी अशी थेट लढत होईल, तर काही ठिकाणी महायुतीमध्येच एकमेकांविरोधात शड्डू ठोकला जाणार आहे.
जिल्ह्यातील १२ पैकी आठ तालुक्यांमध्ये या नगरपालिका आणि नगरपंचायती असून, चार तालुक्यांमध्ये एकही स्थानिक स्वराज्य संस्था नाही. त्यामुळे हे चार तालुके वगळता अन्य आठही तालुक्यात राजकीय संघर्षाचे वातावरण पहावयास मिळणार आहे.
या ठिकाणी रंगणार निवडणुका
नगरपालिका : जयसिंगपूर, गडहिंग्लज, मुरगुड, कागल, मलकापूर, पन्हाळा, पेठवडगाव, कुरुंदवाड आणि हुपरी.
नगरपंचायत : चंदगड, आजरा, हातकणंगले, शिरोळ.