लॉकडाऊनमधील घरगुती वीज बिले माफ करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:08+5:302021-02-05T06:53:08+5:30

जयसिंगपूर : लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प राहिल्याने उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, कनिष्ठ मध्यमवर्गीय या सर्वांचीच दमछाक झाली. यामुळे ...

Domestic electricity bills in lockdown should be waived | लॉकडाऊनमधील घरगुती वीज बिले माफ करावीत

लॉकडाऊनमधील घरगुती वीज बिले माफ करावीत

जयसिंगपूर : लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प राहिल्याने उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, कनिष्ठ मध्यमवर्गीय या सर्वांचीच दमछाक झाली. यामुळे लॉकडाऊनच्या काळातील घरगुती व शेतीपंपाची वीज बिल माफीबाबत सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शिष्टमंडळाने महाविकास आघाडीचे प्रमुख व राष्ट्रवादी पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांच्याकडे केली आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर स्वस्त व काही प्रमाणात मोफत दिलेले धान्य वगळता केंद्र वा राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत जनतेला झालेली नाही. महाराष्ट्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

एकीकडे ही स्थिती असतानाही महावितरण, बेस्ट तसेच अदानी, टाटा पॉवर यांसारख्या खासगी वीज कंपन्यांनी पुढील दरमहा वीज देयके ग्राहकांना पाठविली असून थकबाकी भरण्यासाठी तगादा सुरू असून वीज खंडित करण्याच्या नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या बिलांतील वाढीबद्दल आणि वीजदर वाढीबद्दल लोकांच्या मनात नाराजी आहे. यावेळी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे बाबासो पाटील-भुयेकर, विक्रम पाटील-किणीकर, रावसाहेब तांबे, शैलेश चौगुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कोट - केरळ, मध्यप्रदेश व गुजरात या राज्यातील शासनांनी घरगुती वीज बिलांमध्ये ५० टक्के सवलत दिली आहे; पण महाराष्ट्रात कोणताही निर्णय नाही. याकडे शरद पवार यांचे लक्ष वेधले असताना वीज बिल माफी मागणीबाबत पवार यांनी अनुकूलता दर्शवीत याबाबत राज्य सरकारकडून लवकरात लवकर योग्य तोडगा काढू, असे आश्वासन दिले आहे.

- राजू शेट्टी, माजी खासदार

फोटो - २९०१२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - मुंबई येथे खासदार शरद पवार यांच्याकडे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शिष्टमंडळाने वीज बिल माफीबाबत कार्यवाहीची मागणी केली.

Web Title: Domestic electricity bills in lockdown should be waived