गडहिंग्लजमधील कुत्र्यांची नसबंदी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:51 IST2021-02-05T06:51:40+5:302021-02-05T06:51:40+5:30
गडहिंग्लज : कुत्र्यांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी गडहिंग्लज शहरातील सर्व पाळीव व भटक्या कुत्र्यांची नगरपालिकेतर्फे मोफत नसबंदी करणार आहोत. ...

गडहिंग्लजमधील कुत्र्यांची नसबंदी करणार
गडहिंग्लज : कुत्र्यांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी गडहिंग्लज शहरातील सर्व पाळीव व भटक्या कुत्र्यांची नगरपालिकेतर्फे मोफत नसबंदी करणार आहोत. हा उपक्रम राबविणारी गडहिंग्लज ही पश्चिम महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरी म्हणाले, पेट शॉप अॅक्ट २०१८ व श्वान प्रजनन आणि विपणन नियम २०१७ नुसार महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे पाळीव पशु-पक्ष्यांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे शहरातील पाळीव पशु-पक्षी विक्रेत्यांनी नगरपालिकेचे लायसन्स घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्यांना महिन्याची मुदत दिली जाणार आहे.
भटक्या कुत्र्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. परंतु, त्यांची संख्या वाढून नागरिकांना उपद्रव होऊ नये म्हणून मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून त्यांची नसबंदी केली जाईल. त्यानंतर त्यांना ज्या-त्या ठिकाणी पुन्हा सोडण्यात येईल.
नसबंदीवेळी कुत्र्यांना मायक्रो चीप बसविण्यात येतील. त्यामुळे नसबंदी झालेल्या कुत्र्याची ओळख पटण्यास मदत होईल. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना रॅबीज लसीकरण मोफत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक नरेंद्र भद्रापूर उपस्थित होते.
* पशु-पक्ष्यांची नोंदणी आवश्यक
कुत्री, मांजरासह अन्य पशु-पक्षी पाळणाऱ्यांनी त्यासंदर्भात नगरपालिकेकडे रितसर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी कर आकारणीचा पालिकेचा विचार आहे, असेही कोरींनी सांगितले.
---------------------------