Kolhapur: थेट पाइपलाइन कुचकामी ठरवून सतेज पाटलांच्या बदनामीची सुपारी, काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:22 IST2025-08-30T18:21:43+5:302025-08-30T18:22:04+5:30

पर्यायी पंप का ठेवला नाही

Directly pipeline ineffective Satej Patil defamation is a betel nut Former Congress corporator alleges | Kolhapur: थेट पाइपलाइन कुचकामी ठरवून सतेज पाटलांच्या बदनामीची सुपारी, काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा आरोप 

Kolhapur: थेट पाइपलाइन कुचकामी ठरवून सतेज पाटलांच्या बदनामीची सुपारी, काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा आरोप 

कोल्हापूर : थेट पाइपलाइन योजनेमुळे शुद्ध आणि मुबलक पाण्याचे कोल्हापूरवासियांचे स्वप्न आमदार सतेज पाटील यांनी पूर्ण केले आहे. मात्र, भाजपला हेच खुपत असून ही योजना कशी कुचकामी आहे हे ठरवण्यासाठी भाजपनेच महापालिका अधिकाऱ्यांना सुपारी दिली आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक अधिकारी थेट पाइपलाइनमध्ये बिघाड आणत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी शुक्रवारी केला. अधिकाऱ्यांचे हे षडयंत्र हाणून पाडू, असा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.

गेल्या पाच दिवसांपासून शहरात पाण्याचा ठणठणाट असल्याने थेट पाइपलाइन योजनेवर भाजपने टीका केल्याने काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रशासकांना जाब विचारण्यासाठी महापालिकेत आले होते. मात्र, प्रशासक उपस्थित नसल्याने अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व रविकांत आडसूळ यांची भेट घेऊन माजी नगरसेवकांनी त्यांना धारेवर धरले.

देशात नावाजलेली ही योजना असताना या योजनेत वारवार बिघाड होतोच कसा. ही योजना सुरू असताना त्यात खोडा घालण्याचे काम भाजपने केले. आता हेच भाजपचे पदाधिकारी या योजनेची बदनामी करत आहेत. त्यांनीच थेट पाइपलाइन योजना कुचकामी ठरवण्यासाठी तुम्हाला सुपारी दिली असल्याचा आराेप काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण व दुर्वास कदम यांनी केला. यावेळी भूपाल शेटे, राजाराम गायकवाड, मधुकर रामाणे, पूजा आरडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पर्यायी पंप का ठेवला नाही

इतकी मोठी योजना असताना ठेकदाराची कोणतीच जबाबदारी नाही का, तुम्ही यासाठी पर्यायी पंप व्यवस्था का केली नाही, असा सवाल सचिन चव्हाण यांनी केला. यावर दरेकर यांनी पर्यायी पंप बंद पडल्याची कबुली दिली. हा पंप त्यावेळीच दुरुस्त का केला नाही, महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच हे झाले असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावर आडसूळ यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

शिंगणापूर बंद का ठेवली

शिंगणापूर योजनेवरून २५ ते ३० वॉर्डना पाणीपुरवठा होतो. मात्र, तरीही ही योजना बंद का ठेवली आहे, असा सवाल पदाधिकाऱ्यांनी विचारला. यावर आडसूळ यांनी एकाच वेळी दोन्ही योजनेचे पाणी जात नसल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, तरीही शिंगणापूर योजना कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

Web Title: Directly pipeline ineffective Satej Patil defamation is a betel nut Former Congress corporator alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.