अज्ञात वाहनाच्या धडकेने भाविक पादचारी ठार : मृत गोव्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST2021-01-13T05:05:58+5:302021-01-13T05:05:58+5:30

पेठवडगाव : राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी फाट्यानजीक अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गोवा येथील पादचारी भाविक ठार झाला. हा अपघात मंगळवारी ...

Devotee pedestrian killed in unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेने भाविक पादचारी ठार : मृत गोव्याचा

अज्ञात वाहनाच्या धडकेने भाविक पादचारी ठार : मृत गोव्याचा

पेठवडगाव :

राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी फाट्यानजीक अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गोवा येथील पादचारी भाविक ठार झाला. हा अपघात मंगळवारी साडेतीनच्या सुमारास झाला. या अपघातांची नोंद पोलिसांत झाली आहे.

या अपघातात विश्वास बाळचंद्र सावंत (वय ६२, रा. विठ्ठलपूर, सांकलिम, बिचोलीम, गोवा)

हे ठार झाले. याबाबत फिर्याद शेखर पुंडलिक नाईक (रा. दाजोंवाडा, कुंडईम, फोंडा, नॉर्थ गोवा) यांनी दिली आहे.

घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, गोवा येथून सात वर्षांपासून राज्यामधील विविध ठिकाणांहून लोक सांगोल्डा येथील साईबाबा मंदिरात एकत्र येतात. सांगोल्डा ते महाराष्ट्रातील शिर्डी देवस्थानापर्यंत पायी दिंडीने जात साईंचे दर्शन घेतात. दरवर्षी शंभर लोक एकत्र मिळून दररोज ४० ते ४५ किलोमीटर अंतर चालत प्रवास करतात.

यावर्षीसुद्धा १०६ लोक सांगोल्डा ते शिर्डीला गुरुवारी (दि. ७) पायी रवाना झाले. दरम्यान, ते सोमवारी (दि.११) कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरात रात्री थांबले होते. मंगळवारी सकाळी शिये फाटा मार्ग किणी पथकर नाक्याकडे रवाना झाले. किणी येथील माळी मळ्याजवळ दुपारच्या जेवणाची सोय केली होती. जेवण करून सावंत हे एकटेच पुढे निघाले होते. दरम्यान, अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने

डोक्यास, शरीरास गंभीर दुखापत होऊन ते जखमी अवस्थेत पडले होते. याबाबत एकाने माहिती दिली. अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने उपचारासाठी नवे पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सावंत हे मृत झाल्याचे जाहीर केले. त्यांच्या मृतदेहांची वैद्यकीय तपासणी पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा मृतदेह गोव्याकडे पाठविण्यात आला.

चौकट :

.....साई दर्शनाची इच्छा राहिली अपुरी..!

विश्वास सावंत हे साई भक्त होते. वारीत उत्साहीपणे सहभागी होत होते. जेवण लवकर आटोपून पुढील मुक्कामी जाण्यास बाहेर पडले होते. मात्र, अज्ञात वाहनांच्या धडकेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि पायी साई दर्शन वारीची इच्छा अपुरी राहिली, अशी चर्चा भाविकांतून व्यक्त होत होती. काहीवेळापूर्वी सोबत असलेला आपला सहकारी अपघातात गमावल्यामुळे वारकऱ्यांना मानसिक धक्का बसला.

00000

Web Title: Devotee pedestrian killed in unidentified vehicle collision