MRF Share Price News: एप्रिल २००१ च्या सुरुवातीला एमआरएफच्या (MRF) एका शेअरची किंमत ७८७ रुपये होती. जर एखाद्या व्यक्तीनं त्यावेळी १ लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला कंपनीचे १२७ शेअर्स मिळाले असते. सोमवार, १३ एप्रिल २०२६ रोजी बीएसई (BSE) मध्ये एमआरएफचा शेअर १३४,३९३.४० रुपयांवर बंद झाला. या दरानुसार, त्या १२७ शेअर्सचे आजचे मूल्य १.७० कोटी रुपये झाले असतं. टायर आणि रबर उत्पादनांशी संबंधित असलेल्या या कंपनीचं मार्केट कॅप सोमवारी सुमारे ५७,००० कोटी रुपयांवर पोहोचलंय.
२० वर्षांत ३४०० टक्क्यांहून अधिक वाढ
गेल्या २० वर्षांच्या कालावधीत एमआरएफच्या शेअर्समध्ये ३४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २१ एप्रिल २००६ रोजी शेअरची किंमत ३,८२७.०७ रुपये होती, जी १३ एप्रिल २०२६ पर्यंत १,३४,३९३.४० रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या १० वर्षांचा विचार केल्यास या शेअरमध्ये २९७ टक्क्यांहून अधिक तेजी आली आहे, तर गेल्या ५ वर्षांत यात ६५ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात कंपनीचा शेअर ९ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी १,६३,५०० रुपये, तर नीचांकी पातळी १,१३,८०० रुपये आहे.
गेल्या ६ महिन्यांतील घसरण आणि शेअरहोल्डिंग
एमआरएफच्या शेअरमध्ये गेल्या ६ महिन्यांत १४ टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली आहे. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी शेअर १,५७,५२९.७५ रुपयांवर होता, जो १३ एप्रिल २०२६ ला १३४,३९३.४० रुपयांवर बंद झाला. या वर्षात आतापर्यंत शेअरमध्ये ११ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीतील आकडेवारीनुसार, कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा २७.७४ टक्के आहे, तर सार्वजनिक शेअरहोल्डिंग ७२.२६ टक्के आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
