विद्यापीठातील डीओटी’मध्ये कोविड केअर सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST2021-04-13T04:22:08+5:302021-04-13T04:22:08+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली असून रुग्णांवर उपचार कुठे आणि कसे उपचार करायचे, असा प्रश्न जिल्हा प्रशासन ...

Covid Care Center opens at University DOT | विद्यापीठातील डीओटी’मध्ये कोविड केअर सेंटर सुरू

विद्यापीठातील डीओटी’मध्ये कोविड केअर सेंटर सुरू

कोल्हापूर जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली असून रुग्णांवर उपचार कुठे आणि कसे उपचार करायचे, असा प्रश्न जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासनासमोर आहे. महानगरपालिका हद्दीतही रुग्णसंख्या वाढत असून त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने उचलली आहे. गतवर्षी कोविड महामारीच्या काळात तत्कालिन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी रातोरात शहराच्या विविध भागांत नऊ कोविड केअर सेंटर सुरू केली होती. त्याशिवाय संस्थात्मक अलगीकरण केंद्रेही सुरू केली होती.

शिवाजी विद्यापीठातील डीओटी, वसतिगृहाची इमारत, लाईन बाजार जवळील अंडी उबवण केंद्र, शेंडा पार्क प्रशिक्षण इमारत येथील चार कोविड केअर सेंटर्स पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून त्यातील डीओटी सेंटर सोमवारी प्रत्यक्षात सुरू करण्यात आले. कमी लक्षणे असलेल्या सीपीआर रुग्णालयातील ४० तर आयसोलेशन रुग्णालयातील २० कोविड रुग्णांना तेथे सोमवारी रात्रीपर्यंत स्थलांतर करण्यात आले. त्याठिकाणी उपचारही सुरू करण्यात आले.

सध्या नवीन कोविड रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे प्रशासनावरील ताण अजूनही कमी आहे. मात्र, पुढच्या काळात जर रुग्ण अधिकच संख्येने वाढले तर मात्र कोविड सेंटर्सची गरज भासणार आहे. त्यामुळे जशी गरज भासेल तशी कोविड केअर सेंटर्स सुरू करण्याचे नियोजन असल्याचे महापालिका उपायुक्त निखिल मोरे यांनी सांगितले.

-डॉक्टर्स, नर्स नियुक्त्या सुरू-

कोविड केअर सेंटर्स जशी सुरू होतील तशी तेथे आवश्यक डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉय असा कर्मचारी वर्ग, कंत्राटी पद्धतीने नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नेमणुकासुद्धा आवश्यकतेनुसार होत असल्याचे उपायुक्त मोरे यांनी सांगितले.

Web Title: Covid Care Center opens at University DOT