Kolhapur: घातपात की अपघात?; बेपत्ता झाल्याची तक्रार अन् कार दरीत कोसळल्याचं आलं समोर, दाम्पत्य जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:37 IST2025-10-07T17:25:16+5:302025-10-07T19:37:25+5:30
जखमी दाम्पत्य रात्रभर कारमध्येच होते

Kolhapur: घातपात की अपघात?; बेपत्ता झाल्याची तक्रार अन् कार दरीत कोसळल्याचं आलं समोर, दाम्पत्य जखमी
कोल्हापूर: बहिण आणि दाजी न सांगता निघून गेल्याने त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने भावाने पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यानच सातेरी ता. करवीर येथील दरीत कार कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या अपघातात दाम्पत्य जखमी झाले.
दत्तात्रय रघुनाथ पवार (वय ३२ रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) आणि अश्विनी दत्तात्रय पवार (२८) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. त्यामुळे या घटनेमागे घातपात की अपघात असा संशय व्यक्त होत आहे.
पाचगाव येथील पवार दाम्पत्य हे करवीर तालुक्यातील सातेरी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परतताना पवार यांची कार दरीत कोसळली. यात पवार दाम्पत्य जखमी झाले. जखमी अवस्थेतच ते रात्रभर कारमध्ये होते. सकाळी अपघाताची घटना समोर आली. अन् जखमी दाम्पत्यांना कारमधून बाहेर काढून पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यानच, बहिण आणि दाजींचा संपर्क होत नसल्याने अतुल कृष्णा शिंदे (वय ३४ रा. शनिवार पेठ, पाठण कॉलनी, ता. कराड जि. सातारा) यांनी फिर्याद दिली. अतुल शिंदे यांनी काल (दि.७) रात्री सांगरुळ (ता. करवीर) येथून दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. अन् आज सातेरीच्या दरीत कार कोसळल्याची घटना समोर आल्याने या अपघाताबाबत संशय व्यक्त होत आहे. या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.