शिरोळ : येथील पंचगंगा नदीपात्रात काळेकुट्ट खराब पाणी दाखल झाल्याने पाण्याला उग्र वास येत आहे. शिवाय पाण्यावर तेलकट तवंग दिसत आहे. पंचगंगेचे हेच पाणी नृसिंहवाडीजवळ कृष्णा नदीतही मिसळत आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा फटका पंचगंगेबरोबर कृष्णेलाही बसला आहे. एकीकडे पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना दुसरीकडे नदीपात्रात दूषित पाणी दाखल होत असून, नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेच्या मैलायुक्त सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी गेल्या अनेक वर्षांपासून गटारगंगा बनली आहे. त्यातच नदी दूषित करणारे अनेक घटकही कारणीभूत ठरत आहेत. दरवर्षी पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. नदीपात्रात रसायनयुक्त पाणी दाखल झाल्यानंतर मृत माशांचा खच मोठ्या प्रमाणात साचला जातो. त्यानंतर जलपर्णीचा मोठा विळखा पंचगंगेला बसतो. महाविकास आघाडी सरकारने पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी ठोस उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सध्या शिरोळमधील बंधाऱ्यात पंचगंगा नदीपात्रात काळेकुट्ट दूषित पाणी दाखल झाल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी नदीकाठच्या नागरिकांतून होत आहे.
फोटो - २००१२०१२-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरोळ येथील पंचगंगा नदीपात्रात दूषित काळेकुट्ट पाणी दाखल झाल्यामुळे पाण्यावर तेलकट तवंग दिसत आहे. (छाया : सुभाष गुरव, शिरोळ)